*कोरोनामुळे मूर्तीकार अडचणीत सत्यजितसिंह पाटणकर*

  1.               पाटण :- कोरोना संकटाची काळी छाया येत्या अॉगस्ट अखेर साजरा होणाऱ्या वैभवशाली गणेश उत्सवावर पडली आहे. शासनाने गणेशोत्सव साजरा करताना काही मर्यादा घातल्या आहेत. अगोदरच कच्च्या मालाचा तुटवडा, आर्थिक संकट यामुळे गणेश मूर्तीकार कुंभार समाज प्रचंड अडचणीत सापडला आहे.  या सर्व संकटांमुळे कुंभार समाजाच्या उर्दनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संपुर्ण वर्षभर मूर्तीकार गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करत असतात त्यांच्या या मेहनतीवर कोरोनामुळे पाणी फिरले आहे. या मूर्तीकारांना दुसरे उपजीविकेचे साधन नाही शासनाने याचाही विचार करायला हवा असे मत सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सत्यजितसिंह यांनी पाटण येथील गणेश मूर्तीकारांना भेट देऊन त्यांची विचारपूस केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर यावेळी ते बोलत होते.

               सध्या मूर्तिकारांना कच्च्या मालाचा तुटवडा भासत आहे. कारण वेगवेगळे रंग, सजावटीच्या वस्तू आदी विविध साहित्य जेथून खरेदी केले जाते त्या मुंबई, पुणे आणि कोल्हापूरसारख्या मोठ्या बाजारपेठा लाॅक डाऊनमुळे बंद आहेत. या सर्व अडचणींचा सामना करत आर्थिक संकटाला तोंड देत मूर्ती व्यवसाय पुढे चालू ठेवणे मूर्तिकारांना कठीण जात असल्याचेही मूर्तिकारांनी पाटणकर यांच्याशी बोलताना सांगितले. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यंदाचा गणेशोत्सव मर्यादित स्वरूपात साधेपणाने साजरा करणार आहेत, ज्यामुळे कोरोनाविरोधातील लढ्याला मदत होईल. शासनाने गणेश मूर्तीची उंची जास्तीत जास्त पाच फूट ठेवावे असा निर्बंध घातला आहे.  पाटण शहर व आजुबाजूच्या गावांमध्ये सुमारे दोनशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून जी गणेश उत्सवासाठी दरवर्षी पाच फुटांहून अधिक उंचीच्या गणेश मूर्ती बनविण्याची ऑर्डर देत असतात. परंतु कोरोना विषाणूचा संकटामुळे यांना ९०% टक्क्यांहून अधिक ऑर्डर कॅन्सल झाल्या असल्याची माहिती मूर्तिकारांनी सांगितली. त्याचप्रमाणे घरगुती गणेशमूर्तींची उंची देखील २ फुटांपेक्षा जास्त नसावी असे शासनाने जाहीर केले आहे. याचाही फटका या व्यवसायाला बसणार आहे.  त्यामुळे ज्या मुर्तीकारांनी काही महिन्यांपूर्वी ५ फुटांपेक्षा जास्त मोठ्या मूर्ती तयार केल्या आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशी माहिती मूर्तीकारांनी पाटणकर यांना सांगितली.

              यावेळी सत्यजितसिंह पाटणकर यांनी मूर्तिकारांना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून गणेश मूर्ती लोकांना घरपोहच देता येईल का याचा विचार करावा असे सांगितले. त्यामुळे गर्दी कमी होईल आणि कोरोनाचा प्रसार टाळता येईल. यावेळी मूर्तिकारांनी मनमोकळेपणाने पाटणकर यांच्याशी संवाद साधला, आपल्या समस्या सांगितल्या. पाटणकर यांनीही मोठ्या आपुलकी त्यांची विचारपूस केली, त्यांचा समस्या जाणून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे आश्र्वासन दिले.

(फोटो: पाटण येथील मूर्तिकारांशी चर्चा करताना सत्यजितसिंह पाटणकर व नगरसेवक.)