तीर्थक्षेत्र चाफळला श्रीराम नवमी उत्सवाची तयारी पूर्ण

चाफळः तीर्थक्षेत्र चाफळ येथील 372 व्या श्रीरामनवमी उत्सव चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडवा दि. 6 ते 16 एप्रिल एकादशीपर्यत सुरु असणार्‍या या उत्सवाचा दि. 13 रोजी श्रीराम जन्मकाळाचा मुख्य दिवस आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी व कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर यांनी दिली.
राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींनी चाफळच्या श्रीराममंदीरात सन 1648 मध्ये श्रीरामनवमी उत्सव सुरु केला. चैत्र शुध्द प्रतिपदेपासून एकादशीपर्यत हा उत्सव सुरु असतो. उत्सव काळात दुपारी भजन तर रात्री कीर्तनसेवा होणार आहे. शनिवार, दि. 6 रोजी दुपारी श्रीराम समर्थ भजनी मंडळ यांचे भजन तर रात्री के. बी. क्षीरसागर यांचे नारदीय किर्तन, दि. 7 रोजी श्री विष्णु कृपा भजनी मंडळाचे भजन व वैशाली अवटे यांचे किर्तन, दि. 8 रोजी श्री दांते भजनी मंडळाचे भजन व मयुरी घेवारे (पुणे) यांचे किर्तन, दि. 9 रोजी संगमेश्वर भजनी मंडळाचे भजन व के. बी. क्षीरसागर यांचे किर्तन, दि. 10 रोजी श्री कृष्ण भजनी मंडळाचे भजन व समर्थ भक्त भूषण स्वामी यांचे किर्तन, दि. 11 रोजी श्री माऊली स्वरतरंग भक्तीगीते मंडळ, वडणगे यांचे भजन व विनया कोल्हटकर (पुणे) यांचे किर्तन, दि. 12 रोजी सप्तसूर संगीत ग्रुप कोळेवाडी यांचे भजन व प्रज्ञा वैद्य (बडवे) यांचे किर्तन, दि. 13 रोजी दुपारी 12.20 वाजता श्रीराम जन्मकाळ होणार आहे. तर 12.30 ते 3 या वेळेत काशिनाथ मोहिते (उमरकांचन) यांचे सौजन्याने भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. रात्री के. बी. क्षीरसागर यांचे किर्तन होणार आहे. दि. 14 व 15 एप्रिलला समर्थ सांप्रदायाची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार असून दि. 16 रोजी सुर्योदयाबरोबर रथोत्सव साजरा केला जाणार आहे. तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापक बा. मा. सुतार यांनी केले आहे.