बाळासाहेब खंदारेंच्या वैयक्तिक आरोपामुळे सभागृहात गदारोळ

अजिंक्य रिक्षा युनियनचा विषय तहकूब; 60 विषयांना मंजुरी
सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी
सातारा : सातारा पालिकेतील नगरविकास आघाडीचे तडफदार नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांचा असंसदीय आरोपांचा उत्साह सोमवारी पालिकेच्या सभागृहात पुन्हा ऊतू गेला. पोवई नाक्यावरील रजतांद्री हॉटेलच्या भिंतीच्या अतिक्रमणाला सातारा विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक अ‍ॅड. दत्ता बनकर यांचा पाठिंबा आहे. असा थेट आरोप त्यांनी केल्याने सत्ताधारी व विरोधक यांच्यात अर्धा तास जोरदार खडाजंगी झाली. तुम्ही सभागृहाची माफी मागा अन्यथा सभागृह तहकूब करु असा आक्रमक घणाघात सत्ताधार्‍यांनी केल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले. मात्र, विरोधक आणि सत्ताधारी यांच्या साठमारीत प्रशासनाच्या कारभाराची पिसे निघाली. नगरसेवकांच्या मर्जीतील विषय तहकूब झाल्याने साविआच्या पक्षप्रतोद स्मिता घोडके यांचे नियोजन फिसकटले. सोमवार पेठेतील 221, 222 येथील राजीव गांधी मल्टिपर्पज हॉल आणि अजिंक्य रिक्षा टॅक्सी संघाला देण्याचा विषय तहकूब करण्यात आला. मात्र भाजपने सातारा शहरातील रस्त्यांसाठी आणलेले 3 कोटी रुपये सातारा विकास आघाडीने अखेर पळवले. बहुमताच्या जोरावर हा विषय सुद्धा रेटून मंजुर करण्यात आला. सुमारे 4 विषयांवर उपसूचना आणि मतदान अशा प्रक्रियेतून सभागृहाला जावे लागले. सभेच्या सुरुवातीलाच मागील सभेचे इतीवृत्त वाचण्यावरुन अशोक मोने यांनी सभासचिव सुर्यकांत भोकरे यांची चांगलीच हजेरी घेतली. त्यावरुन खुलासा करण्यासाठी उठलेल्या मुख्याधिकार्‍यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले. तेव्हा अ‍ॅड. दत्ता बनकर यांनी तुमचा विरोध ठरावाला आहे, इतीवृत्ताला नाही त्यामुळे जितका आहे तितकाच आरोप करा असे त्यांना सांगितले.
लाड कमिटीच्या शिफारशीनुसार दोन कर्मचार्‍यांना नियुक्त्या देण्यात आल्या. त्यावर नगरसेवक शेखर मोरे पाटील यांनी उपसूचना मांडून या नियुक्त्या संशयास्पद असल्याचा आरोप केला. तेव्हा हा विषय 26 विरुद्ध 7 विषयांनी मंजुर करण्यात आला. रविवार पेठेतील नवीन मार्केट बांधण्यावरुनही सत्ताधारी व विरोधक यांच्यात वादाचे फटाके फुटत राहिले. नवीन इमारत बांधताय असा आरोप होताच सर्वे नं. 182 रविवार पेठ येथे जुन्या इमारतीचे नुतनीकरण असे घुमजाव बनकर यांनी केल्याने जोरदार वादंग झाला.
सिद्धी पवार यांचा सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल
भाजपच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी सातारा शहरातील व्यापारी संकुले ही केवळ नगरसेवकांच्या नातेवाईकांना देण्यासाठी आहेत काय? असा सवाल करत प्रशासनाला धारेवर धरले. तसेच सातारा नगरपालिकेला प्रतापसिंह शेती उद्यानाची मोकळी जागा मिळवणेकामी उगाच किती वर्षे आपण नको ते विषय अजेंड्यावर आणून सातारकरांची दिशाभूल करणार आहोत असा करडा सवाल केला. 43 लाख रुपयांचा होणारा चुराडा हा जनतेच्या खिशातला आहे. याचं भान ठेवलं पाहिजे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांना सातार्‍यात दंड होत नाही. या सर्व दिशाभुल करणार्‍या बाबी तातडीने बंद झाल्या पाहिजेत. तसेच याउलट सातारा शहरात अनेक मोकळ्या जागा आहेत. या मोकळ्या जागा शासनाकडून मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केला पाहिजे, असे सांगत त्यांनी या विषयाला विरोध नोंदवला.
बाळासाहेब खंदारेंच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ; माफी मागण्याची सत्ताधार्‍यांची मागणी
सभेच्या सुुरुवातीलाच नगराध्यक्षा माधवी कदम यांनी एका विषयावर एकदाच बोलायचे आणि तेही दोन मिनिटात असा दंडक घालून दिला होता. मात्र बाळासाहेब खंदारे यांनी सभेच्या सुरुवातीलाच दगडी शाळेतील भंंगार चोरीचा विषय काढून चर्चेची गाडी भलतीकडेच वळवली आणि सी.ओ. साहेब तेवढं पारदर्शक कारभाराचं बघा, राजकीय दबावाचं गालबोट तुम्ही स्वत:ला लावून घेऊ नका, असा खंदारे यांनी सांगत रजतांद्रीच्या अतिक्रमणाचा विषय उपस्थित केला. अतिक्रमणात गरिबांच्या टपर्‍या निघतात पण धनदांडगे तसेच राहतात. या चर्चेमुळे नगराध्यक्षांनी त्यांना पुन्हा एकदा समज दिली. तेव्हा खंदारे यांनी स्वत:ला आवरले. मात्र सातारा शहरात अतिक्रमणे काढण्यासाठी ठेका पद्धतीने कर्मचारी भरण्याचा विषय येताच बाळासाहेबांना स्वत:च्या भावना आवरता आल्या नाही. तहसिलदार कार्यालया लगतची अतिक्रमणे काढा. येथील काही टपर्‍या उपनगराध्यक्ष राजू भोसले यांच्या पाहुण्यांच्या आहेत, रजतांद्री हॉटेलच्या भिंतीचे जे अतिक्रमण आहे. ते अ‍ॅड. दत्तता बनकर यांच्यामुळे साबुत आहे, असा थेट हल्लाबोल नगरविकास आघाडीकडून झाल्याने साविआच्या सर्वच नगरसेवकांचे पित्त खवळले आणि असंसदीय भाषेत बोलू नका, सभागृहाची माफी मागा अन्यथा सभा इथेच थांबवू, जे बोलताय ते जबाबदारीने बोला अशी खडाजंगी सत्ताधारी व विरोधकांमध्ये झाली. खंदारे यांनी माफी मागावी असा आक्रमक अविर्भाव सर्वांचाच सुरु झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
धनंजय जांभळेही कडाडले
भाजपचे गटनेते धनंजय जांभळे, आशा पंडित व सिद्धी पवार यांनी सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल केला. सिद्धी पवार यांनी अनेक विषयांमध्ये उपसूचना मांडून मुख्याधिकार्‍यांना खुलासा करण्यास भाग पाडले. आशा पंडित यांनी जेसीबी व डंपर या विषयावर तीव्र नापसंती व्यक्त केली. या खरेदीमध्ये नक्की काय होणार आहे हे कोणालाच कळणार नाही, असा घणाघात त्यांनी केला. जांभळे यांनी सातारा शहरातील रस्त्यांसाठी भाजपने तीन कोटी रुपयांचा निधी आणला. तो भाजपच्या 6 नगरसेवकांच्या वॉर्डात खर्च केला गेला जावा अशी जोरदार मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व जरंडेश्‍वर नाका येथील भिमाई स्मारकासाठी सुद्धा भाजपनेच निधी आणला आहे. सत्ताधार्‍यांनी अन्य रस्त्यांसाठी तसे प्रस्ताव द्यावेत. कोणताही दुजाभाव न करता आपण गटनेता या नात्याने संपूर्ण सातारा शहरासाठी निधी मंजुर करुन आणू अशी जोरदार बॅटींग जांभळे यांनी केली.