मंगळवारी विक्रमसिंह पाटणकर यांचा भव्य अमृतमहोत्सव सोहळा; खा. शरद पवार यांचे हस्ते जाहीर नागरी सत्कार

पाटण : पाटण तालुक्याचे भाग्यविधाते व राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी गौरव सोहळा मंगळवार दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पाटण येथील बी. एड. कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघात गावोगावी भव्य कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विक्रमसिंह पाटणकर अमृतमहोत्सव गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष तथा पंचायत समिती उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली.
यावर्षी विक्रमसिंह पाटणकर यांच्या वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांच्या वतीने त्यांचा भव्य अमृतमहोत्सव गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांचेसह विधान परिषद सभापती ना. रामराजे निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आदींसह आजी, माजी मंत्री, आमदार, खासदार तसेच राज्य व जिल्ह्यातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत. सकाळी देवदर्शन करून दादा कार्यक्रमस्थळी उपस्थित रहातील तेथे त्यांचा तमाम पाटण मतदारसंघातील जनतेच्या वतीने खा. शरद पवार यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात येईल. या कार्यक्रमानंतर दादा खा. शरद पवार यांचेसह पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान करणार आहेत. या कार्यक्रमाला येताना कोणीही हार, गुच्छ आणू नयेत त्याच खर्चातून आपल्या गावातील व परिसरातील अंगणवाड्या, प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेवाटप करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या अमृतमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने मतदारसंघात नानाविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये निसर्ग चित्रकला स्पर्धा, कबड्डी, दि. 27 रोजी क्रिकेट स्पर्धा व मल्हारपेठ येथे सांस्कृतिक कार्यक्रम, दि. 29 रोजी राजे व्यायामशाळा पाटण यांचवतीने दादाश्री 2018 शरीर सौष्ठव स्पर्धा, 2 जानेवारीला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा, 3 तारखेला राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, व किर्तनाचा कार्यक्रम, 4 रोजी व्हॉलीबॉल बक्षीस वितरण समारंभ, 5 रोजी बॅडमिंटन स्पर्धा यासह शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रूग्णांना फळे वाटप, आरोग्य व रक्तदान शिबीर आदींचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सर्व कार्यक्रमांना सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही राजाभाऊ शेलार व गौरव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दि. 26 ते 28 ला विक्रमसिंह पाटणकर परगावी.
विक्रमसिंह पाटणकर यांचा वाढदिवस हा तारखेने 27 डिसेंबरला असतो. चालूवर्षी त्यांच्या वयाची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत असल्याने हा अमृतमहोत्सव सोहळा दि. 25 डिसेंबरला संपन्न होणार आहे. त्यामुळे त्यानंतर दादा 26 ते 28 तारखेपर्यंत घरगुती कार्यक्रमांसाठी परगावी जाणार असल्याने ते दि. 27 रोजी पाटण मध्ये उपस्थित नसल्याची नोंद पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी घ्यावी असेही राजाभाऊ शेलार यांनी स्पष्ट केले आहे.