‘महिलांच्या कर्तृत्वाला पाठिंबा दिला तरच समाज पुढे येईल’

केळघरः मुलींना भेदभावाची वागणूक न देता समानतेची वागणूक द्या. आज प्रत्येक क्षेत्रात मुलांबरोबरच मुलीही आघाडीवर आहेत. ज्या घरात महिलांचा सन्मान राखला जातो. तेच घर आज खर्‍या अर्थाने पुढारलेले आहे, असे म्हणता येईल. त्यासाठी महिलांच्या कर्तुत्वाला पाठिंबा दिला तरच समाज पुढे येईल, यासाठी मुलींना जास्तीत जास्त शिकवले पाहिजे, असे मत पंचायत समितीच्या सदस्या कांताताई सुतार यांनी व्यक्त केले.
एकात्मिक बालविकासच्या केळघर बीटच्या वतीने येथील भैरवनाथ मंदीरात आयोजित बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या प्रारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी केळघरचे सरपंच रविंद्र सल्लक, एकात्मिक बालविकासच्या पर्यवक्षक एम.व्ही.सपकाळ, मुख्याध्यापक संपत सुर्वे, विजय जुनघरे, सुषमा थोरात, ग्रामपंचायत सदस्य सावित्रा बेलोशे, आरोग्य सेविका डी.एस.परवते यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरपंच सल्लक यांनीही मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका सपकाळ यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या वतीने राबवण्यात येणार्‍या विविध योजनांची माहिती दिली. प्रारंभी गावातून विद्याथ्यार्ंची जनजागृतीपर फेरी काढण्यात आली.
यावेळी अंगणवाडी सेविकांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास केळघर बीटमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.