सैन्यातील धार्मिकीकरण भांडवलशाहीपेक्षा धोक्याचे : कॉ. नलावडे

सातारा : देशाचे मारेकरी समोर असूनही धर्मांध विचारांचे लोक सत्तेत असल्याने असहिष्णू वातावरण झपाट्याने वाढत आहे. काही लोकांच्या मर्जीने कारभार सुरू असून मूठभर भांडवलशाहीला पोसण्याचे काम मनुवादी विचारांचे लोक सत्तेत बसून करत आहेत. हे धर्मांध प्रवृत्तीचे शासक शिवरायांसह फुले, शाहू-आंबेडकरांचे नाव घेत घटनेला सुरुंग लावत असून सैन्य दलात धर्मांधता निर्माण केली जात असल्याने नागरिकांनी सुजानपणे याची चिकित्सा केली पाहीजे. नको ते सत्ताधीश झाल्यामुळे वंचित घटक पुन्हा पाच हजार वर्षे मागे गेला असल्याचे मत कॉ. वसंत नलावडे यांनी मांडले. 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ये आझादी झुठी है, देश की जनता भुकी है डफावर हात टाकत या शब्दात शाहीरी दाखवली होती. त्यानिमित्ताने रविवार पेठेतील समाजमंदिरात आयोजित व्याख्यानमालेत कॉ. नलावडे बोलत होते. यावेळी जयंत उथळे, अजय कांबळे, भगवान अवघडे, अमर गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना कॉ. नलावडे म्हणाले, शासक क्रूरता निर्माण करताना नागरिकांना वेठीशी धरत असेल तर क्रांतीची बीजे आपोआप पेरली जातात. सध्या ज्या घटना देशात घडत आहेत, त्या क्रांतीला प्रेरणा देणार्‍या आहेत. अमेरिका ज्याप्रमाणे मेक्सिकोतील नागरिकांशी वागत आहे, ते पाहता आपल्या देशात जे सुरू आहे ते झुंडशाहीचे प्रतिक आहे. लोकांना भावनिक करताना विकासाचा भुलभुलैय्या दाखवणारे शिक्षण-आरोग्यावर घाला घालत असून लोकशाही संपवताना पुन्हा मनुपाठ रुजवण्यासाठी कत्तली आणि दंगली घडवून आणत आहेत. क्रांतीदिनी संविधानाच्या प्रति जाळणारे आज सातार्‍यातील करंजेगावापर्यंत पोहचलेत. पुरोगामी विचारांच्या सातारकरांनी या प्रवृत्तीविरोधात ठामपणे उभे राहिले पाहीजे. जो विरोधात बोलेल, तो नक्षलवादी हे सरळ सूत्र सध्याच्या शासनाकडून राबवले जात आहे. शोकांतिका म्हणजे 18 मोठे पेपर-चॅनेलचे मालकीहक्क एका गटाकडे गेल्याने प्रोपौगंडा निर्माण करण्याची हातोटी सत्ताधार्‍यांनी साधली असून यामुळे उपेक्षित-वंचित घटकाला न्याय कसा मिळेल, असा प्रश्न कॉ. नलावडे यांनी उपस्थित केला. कष्टकरी-कामगार, उपेक्षित आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करणार्‍यांची पिच्छेहाट होत  आहे. त्यामुळे या मातीत घडलेल्या महापुरुषांच्या विचारांचा जागर ठेवत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.