महाराष्ट्रातील 40 धरणे तुडुंब

पुणे : राज्यभरातील संततधार पावसाने धरणसाठयात लक्षणीय वाढ होत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 101 प्रकल्पांपैकी जवळपास 20 धरणे ओव्हरफ्लो झाली असून, 20 धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे राज्यातील जलसाठा आता 59 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोकणापासून ते विदर्भापर्यंत सर्वदूर सध्या दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे धरणासाठयाची वाटचाल 48 टक्क्यांवरून साठ टक्क्यांच्या दिशेने सुरू आहे. नाशिक विभागातील गोदावरी, प्रवरेचा उगम असलेल्या त्र्यंबकेश्वर व अकोले पट्टयात सध्या प्रचंड पाऊस होत आहे. त्यामुळे 15 ऑगस्टआधीच काही धरणे भरली असून, अनेक धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.
नगर जिल्हयासाठी जीवनदायिनी असलेले भंडारदरा धरण तुडुंब भरले आहे. त्यामुळे जिल्हयाचा पाणीप्रश्न मिटला आहे. याशिवाय नगरमधील मुळा धरण 82, तर निळवंडे 62 टक्के भरले आहे. नाशिकमधील इगतपुरी येथील भावली धरण 100 टक्के, वाघाड 100 टक्के भरले असून, उर्ध्व वैतरणातील साठाही 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय दारणात 79, गंगापूरमध्ये 79, कडवा 83, पुणेगाव 83, गिरणा 34, जळगावातील हातनूर 17, वाघूर धरणात 53 इतका पाणीसाठा आहे.
पुणे विभागातील धरणांच्या क्षेत्रातही चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे राधानगरी, खडकवासला, चासकमान, गुंजवणी आदी धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्यातील पानशेतमध्ये 93, नीरा देवधर 92, वरसगाव 79, डिंभे, कुकडी-येडगाव 85, टेमघर 68, साताऱयातील कृष्णा धोम 82, कृष्णा कण्हेर 90, उरमोडी 86, तारळी 87, धोम बलकवडीत 87 टक्के जलसाठा आहे. महाराष्ट्रासाठी वरदान असलेल्या कोयना धरणाचा साठा 80 टक्क्यांवर पोहोचला आहे. सांगलीतील वारणामध्ये 96, कोल्हापुरात दुधगंगा 69, तुळशी 78, तिलारीत 67 टक्के पाणीसाठा आहे.

 

नाशिकमधून विसर्ग सुरू असल्याने मराठवाडयातील जायकवाडीतील पाणीसाठा झपाटयाने वाढत आहे. शून्यावरून येथील साठा 33 टक्क्यांवर पोहोचला आहे. विष्णुपुरीत 80 टक्के साठा आहे. मांजरा, माजलगाव अजूनही शून्यावर असून, त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. उजनीचा साठा पुण्यातील पावसावर अवलंबून असून, सध्या खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीतील साठाही वाढण्याची अपेक्षा आहे.