बेकायदा कत्तलीसाठी नेणाऱ्या ४७ जनावरांची गोरक्षकांकडून सुटका : नवारस्ता व ढेबेवाडीत ५ वाहनांवर कारवाई

 

 

 

 

 

पाटण:-कत्तलीसाठी दोन पीकअप गाड्यांमधून १७ देशी गाईंची वाहतूक करणाऱ्या गाड्या नवारस्ता (ता. पाटण) येथील गोरक्षकांनी  पकडून वाहन चालकांना चांगलाच चोप देत धडा शिकविला. तसेच संबंधित व्यक्तींना गाड्यांसह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर ढेबेवाडी घाटातही गोरक्षकांनी ३० गाई व बैलांची वाहतूक करणाऱ्या तीन गाड्या पकडल्या असून त्या गाड्या ढेबेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. या दोन्ही घटनांची नोंद मल्हारपेठ आणि ढेबेवाडी पोलिसात झाली असून पोलिसांनी गाड्यांसह चालकांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, नवारस्ता येथे पकडण्यात आलेल्या गाड्यांमधील तीन गाई मृत अवस्थेत सापडल्याने जमलेला जमाव चांगलाच संतप्त झाला होता. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
याबाबत मल्हारपेठ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सोमवार दि.१ रोजी पहाटे ५.२० वाजण्याच्या सुमारास कराड-पाटण रोडवर नवारस्ता येथील पेट्रोल पंपासमोर पिकअप गाडी (क्र एम. एच. ०६ एजी  १७५०) व गाडी (एम. एच. १० एक्यु  ३७६४) या दोन पिकअप गाड्यांमधून बेकायदा कत्तलीसाठी चिपळूणहून कराड व इस्लामपूरच्या दिशेने १७ देशी गाईंची वाहतूक करणाऱ्या नवारस्ता येथे गोरक्षकानी सापळा रचून पकडल्या. गाडीमध्ये जनावरांना रेचून भरण्यात आल्याने एका गाईचे वासरु मृत झाले होते. त्यामुळे उपस्थित चिडलेल्या गोरक्षकांच्या जमावाने दोन्ही गाड्यांमधील चालक व विक्रीस नेणाऱ्या लोकांना चांगलाच चोप देवून गाड्यांसह त्यांना मल्हारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार कृष्णत कोरे, सुरज कांबळे, संतोष शिंदे, अनिकेत झिमुर, अनिकेत कांबळे व स्वप्नाली कोरे (सर्व रा. उरुन, इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली) यांच्यावर मल्हारपेठ पोलिसात बेकायदा गाईंची कत्तलीसाठी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर दोन पिकअप गाड्या व   एक सेंट्रो कार (एम. एच. ०४ सीजी ८८०१) अशा एकूण ३ गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. नवारस्ता येथे पहाटे गोरक्षकांच्या मदतीने व्यायामाला गेलेल्या वैभव पवार, अमित माथणे, नितिन माथणे, सुनिल माथणे यांनी तेलेवाडी येथे या गाड्या पाठलाग करुन पकडल्या. ढेबेवाडी घाटातही बेकायदा जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन गाड्या पकडण्यात आल्याने यापाठीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, या टोळीचा म्होरक्या इक्बाल (इस्लामपूर) व अजून एक जण कराड येथील असल्याचे बोलले जात आहे. नवारस्ता येथेे सकाळपासूनच युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती. गाडीत जनावरे खचाखच भरल्याने त्यातील एका वासराचा मृत्यू झाल्याने युवकवर्ग चांगलाच आक्रमक झाला होता. मल्हारपेठ येथील पशुवैद्यकीय डॉक्टराना बोलावून मृत वासराचा पंचनामा करण्यात आला. तर इतर अत्यवस्थ गाईंवर उपचार करुन या सर्व गाईंना शिरवळ येथील गोशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती पाटणचे सहाय्य पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यानी सांगितले. याचा अधिक तपास मल्हारपेठचे हेड कॉंस्टेबल संतोष कोळी करत आहेत.

*ढेबेवाडीत तीन गाड्यांसह ३० जनावरे ताब्यात*

दरम्यान, सोमवारी पहाटेच नवारस्ता येथून आणखी तीन गाड्या बेकायदा जनावरे कत्तलीसाठी घेवून ढेबेवाडी घाटातून खाली गेल्या असल्याची माहिती युवकांनी ढेबेवाडी पोलिसांना दिल्यानंतर ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि भजनावळे, सहाय्यक फौजदार पवार, माने, शेळके, यादव, खवळे यांनी एकत्रितपणे ढेबेवाडी ते नवारस्ता मार्गावरील मंद्रुळकोळे गावच्या हद्दीत भवानी माता मंदिराजवळ सापळा लावला. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नवारस्ता बाजूकडून ढेबेवाडीकडे  बेकायदा कत्तलीसाठी जनावरे घेवून जाणाऱ्या दोन टेम्पो (क्र. एम. एच. ०८ एच. ३२७७ आणि एम. एच. ०८ एच. ३३८८) व एक पिकअप (क्र. एम. एच. ०८ एच. ३९७६) अशा तीन गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या गाड्यांमध्ये दाटीवाटीने कोंबलेली एकूण ३० जनावरे आढळून आली. त्यातील एका बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार गाडी चालक समीर हसन ढेलेकर, मालक हुसेन गनी खिरटकर ( दोघे रा. खेर्डी, ता. चिपळूण. जि. रत्नागिरी), चालक अलिसहाब बालामिया चौगुले (रा. खेर्डी), गाडी मालक भरत आजाबा पाटील (रामापूर, पाटण), गाडी चालक व मालक साजिद कादीर चौगुले (रा. खेर्डी) या सर्वांवर ढेबेवाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वाहनांमध्ये जनावरे दाटीवाटीने कोंबून त्यांना पाण्याची, औषधांची, चाऱ्याची व हवेची सोय न करता कत्तल करण्यासाठी ही जनावरे वाहतुकीचा परवाना नसताना व खरेदी विक्रीच्या पावत्या नसताना मिळून आले आहेत. तसेच साजिद कादीर चौगुले याला एका बैलाच्या मृत्यूस कारणीभूत प्रकरणी अशा पध्दतीने सर्वांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  याची फिर्याद पोलीस हवालदार रामराव संपत वेताळ यांनी दिली आहे. याचा अधिक तपास ढेबेवाडीचे सपोनि भजनावळे करत आहेत.

पाच पोलीस नाके कशासाठी?

बेकायदा कत्तलीसाठी दाटीवाटीने कोंबून जाणारी ही सर्व वाहने चिपळूणहून पाटणमार्गे कराड व इस्लामपूर येथे जाणार होती. या मार्गावरून सातत्याने मोठ्या प्रमाणात जनावरांची अशा पध्दतीने वाहतूक सुरू असते. या मार्गावर बहादूर शेख नाका, पोपळी, घाटमाथा, कोयना, पाटण या  पाच ठिकाणी पोलीस तपासणी नाके आहेत. येथे दररोज येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाते. असे असताना ही बेकायदा जनावरांची वाहतूक करणारी वाहने पोलिसांच्या निदर्शनास का आली नाहीत? की आर्थिक तडजोडीने ही वाहने सोडली जातात अशी चर्चा उपस्थित युवकांमध्ये सुरू होती.