सहपालकमंत्र्यांची आढावा बैठक म्हणजे निव्वळ फार्स -: अमोल येलमर पाटील

मायणी – जिल्ह्याचे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा कळवळा असल्याचा आव आणत, आढावा बैठक घेतली, मात्र हा निव्वळ फार्स असल्याची टीका , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अमोल येलमर पाटील यांनी केली आहे. स्वाभिमानीने याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता अतिघाईने अशी आढावा बैठक घेऊन काय साध्य केले आहे, याचे उत्तर द्यावे. खटाव दुष्काळग्रस्तांच्या यादीत येण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी मोर्चे, आंदोलने केली त्याशिवाय स्वाभिमानीच्या पुढाकाराने ऐन दिवाळीत दुष्काळ जाहीर होण्याच्या मागणीसाठी काळी दिवाळी साजरी करण्यात आली, त्यावेळी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत तुम्ही कुठल्या विश्वात रमला होता, असा सवालही स्वाभिमानी शेतकरी संघटनेन उपस्थित केलाय. आगामी माढा लोकसभा मतदारसंघात काहीतरी लुडबुड करता यावी, याकरता कॉंग्रेसच्या आमदारांना सोबत घेऊन बिनकामाच्या बैठकीचे खेळ करणे बंद करावे, असा सल्लाही येलमर पाटील यांनीही दिलाय. मात्र गेल्या वेळी माढा लोकसभा मतदारसंघात जनतेने भरभरून मते दिली, त्याची परतफेड काय केली, जनता दुष्काळात होरपळत असताना इकडे फिरकलाही नाही हे जनतेला माहीत आहे.