Thursday, April 18, 2024
Homeठळक घडामोडीआ. गोरेंच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याने युतीतील अनेकांच्या आकांक्षांना नवे धुमारे

आ. गोरेंच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याने युतीतील अनेकांच्या आकांक्षांना नवे धुमारे

वडूज (धनंजय क्षीरसागर) : लोकसभा निवडणूकीचे वारे सुरु झाल्यापासून माणचे आमदार जयकुमार गोरे हे आगामी काळात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अश्या जोरदार वावड्या उठल्या होत्या. मात्र मागील आठवड्यात नाट्यमयरित्या घटना घडल्या आहेत. लोकसभा निवडणूकीत आघाडी धर्माला काळीमा फासून भाजपाच्या उमेदवारास निवडूण आणणार्‍या आ. गोरे यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कोणतीही कारवाई न करता उलटपक्षी त्यांना विधानसभेत पक्षाचे प्रतोदपद बहाल करण्यात आले आहे. या निवडीमुळे त्यांचा भाजपा प्रवेश टळला आहे. या घडामोडीमुळे भाजपा-शिवसेना व मित्र पक्ष युतीतून माण विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असणार्‍या इतर संभाव्य उमेदवारांच्या आशा-आकांक्षांना नवे धुमारे फुटले आहेत.
या घडामोडीची चाहूल लागलेल्या माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर यांनी पक्षाने आदेश दिलेल्या आमदार गोरे समर्थक उमेदवारास वडूजच्या नगराध्यक्ष निवडणूकीत सहकार्य न करता वेगळी वाटचाल चोखाळली आहे. त्यांनी वडूजच्या कार्यकत्यांचा राष्ट्रवादीशी असलेला दोस्ताना कायम ठेवत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणूकीनंतर एकत्रित मिरवणूक काढली. त्यानंतर राष्ट्रवाीचे नगराध्यक्ष सुनिल गोडसे, उपनगराध्यक्षा किशोरी पाटील यांच्यासह सत्ताधारी गटातील आठ ते दहा नगरसेवकांना घेवून त्यांनी मुंबई येथे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर ओळख परेड सादर केली.
दुसरीकडे भाजपातील इच्छुक उमेदवार अनिलभाऊ देसाई यांनीही दहिवडी येथे पक्ष कार्यकत्यांचा जाहीर मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी डॉ. महादेव कापसे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आ. गोरेंना पक्षात घेवून नये असा जाहीर ठराव मांडला. व टाळ्यांच्या गजरात तो संमतही करुन घेतला. त्याचबरोबर वरकुटे मलवडी परिसरात आलेल्या टेंभूच्या पाण्याच्या कडीला झणझणीत फोडणी देत देसाई यांनी पत्रकार परिषदेत देसाई यांनी आ. गोरे यांच्यावर जोरदार टिकेची झोड उठविली.
तर भाजपा कार्यकत्यांनी केलेल्या आ. गोरे विरोधी ठरावाचे शेखरभाऊ गोरे गटानेही समाज माध्यमातून जोरदार स्वागत केल्याचे जाणवले. तर दोन दिवसांपूर्वी वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने शेखरभाऊ गोरेंना बोथे येथील पवनचक्की संदर्भातील कस्तुरबाई घाडगे प्रकरणातून दोषमुक्त केले आहे. दहिवडी येथील तालुका न्यायालयाने याप्रकरणात त्यांना तीन वर्षाची शिक्षा सुणावली होती. जिल्हा न्यायालयाने हीच शिक्षा कायम ठेवली असती तर कदाचित त्यांना निवडणूक लढविता आली नसती. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निवाड्याने शेखरभाऊ समर्थकांच्या अंगात बारा हत्तीचे बळ आले आहे. स्वत: शेखरभाऊ गोरेही निराशा झटकून जोरदार कामाला लागल्याचे चित्र आहे. दुष्काळी परस्थितीत गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करणे, पाणी फौंडेशनच्या कामात सढळ हाताने मदत करत ते माणबरोबर खटाव तालुक्यातही चर्चेत आले आहेत. स्थानिक पातळीवर प्रभावी कामगिरी करण्याबरोबर ते भाजपाच्या मुख्यमंत्री कार्यालयाबरोबर मातोश्री शीही मधूर संबंध जोपासत आहेत.
माण मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला कायम राहिल या अपेक्षेने हरणाई व माणदेशी सुतगिरणीचे संस्थापक रणजिसिंह देशमुखही गतकाळातील निराशा झटकून कामाला लागले आहेत. त्यांनी दुष्काळी परस्थितीत पशुपालकांना दिलासा देण्यासाठी आपल्या दोन्ही सुतगिरण्या मार्फत माण-खटाव 20 ते 25 ठिकाणी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. याशिवाय 10 वी 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, शैक्षणिक सहित्य वाटप अश्या वेगवेगळ्या उपक्रमातून ते चर्चेत आहेत. आपले भरीव संस्थात्मक कामकाज व संघटीत ताकद दाखवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी माणदेशी सुतगिरणीच्या मैदानावर पालकमंत्री विजयबापू शिवतारे तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनाही निमंत्रित केल्याची चर्चा आहे. पिंगळीच्या माळावरील साखर कारखान्याच्या प्रकल्पाला मूर्तस्वरुप देवून विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्याचा त्यांचा नेक इरादा आहे.
युतीमध्ये होत असलेल्या या सर्व घडामोडींकडे विधानपरिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे हेही लक्ष ठेवून आहेत. लोकसभा निवडणूकीत भाजपा आघाडीला अभूतपूर्व यश मिळालेेेेेे. विधानसभा निवडणूकीतही काँग्रेस आघाडी सत्तेवर येण्याची शक्यता फारच कमी आहे. अश्या परस्थितीत बुडत्या जहाजात थांबण्यापेक्षा पर्यायी मार्ग चोखाळलेला योग्य असा विचारही चाणाक्ष व्यापारी वृत्तीचे घार्गे साहेब करु शकतात असा जाणकारांचा होरा आहे. त्यातच अलिकडच्या काही दिवसात स्वत: घार्गे साहेबही लोकांचा संपर्क वाढविण्याबरोबर चाचपणी करत असल्याचे जाणवते. मुंबई येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीस गैरहजर राहून त्यांनी सूचक इशारा दिल्याचे जाणवते.
एका बाजूला घार्गे साहेब बैठकीस गैरहजर होते. मात्र दुसर्‍या बाजूला निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, जि.प.सदस्य सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, प्रा. अर्जुनराव खाडे यांच्यासह माजी सभापती संदिप मांडवे यांनी बैठकीस आवर्जुन हजेरी लावली होती. यावेळी पवार साहेब व अजितदादांसमोरच पक्षाने खटावला विधानसभा लढविण्याची संधी देण्याची जोरदार मागणी केली. विधानसभेला पै. मांडवे स्वत:च शड्डू ठोकण्याच्या मानसिकतेत असल्याची चर्चा आहे. अलिकडच्या काळात त्यांनी दोन्ही तालुक्यात जोरदार संपर्क वाढविला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular