मंगळवार ठरला आंदोलन डे; विविध संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सातारा : कामगार संघटना संयुक्त कृती समिती सातारा, भारतीय किसन संघ, सातारा जिल्हा केमिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन, महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघ अशा विविध संघटनानी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच प्रलंबित मागण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामुळे मंगळवार हा दिवस आंदोलन डे ठरला आहे.
कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे मोर्चा
केंद्रीय कामगार संघटना तसेच विविध उद्योगातील राष्ट्रीय फेडरेशन्स यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील कामगारांनी दि. 8 व 9 जानेवारी रोजीच्या देशव्यापी संपात सहभागी होत आहेत. रोजगार निर्मिती व नोकरभरती करा, कामगार कायद्याची कडक अंमलबजावणी करा, कामगारांना सामाजिक सुरक्षा लागू करा, किमान वेतन 18 हजार लागू करा. शेतमजूर, असंघटीत कामगारांना 600 रुपये पेन्शन द्यावी, सार्वजनीक उद्योगांचे खाजगीकरण थांबावावे, बोनस व प्रो. फंड लागू होण्यासाठी पात्रतेची कमाल मर्यादा रद्द करा, रेल्वे व संरक्षण क्षेत्रात परदेशी गुंतवणूकीला विरोध, एनपीएस रद्द करुन पेन्शन योजना लागू करा यासाठी कॉ. अवघडे, कॉ. अंजली महाबळेश्‍वरकर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी मोर्चा काढला.
अंगणवाडी सेविकांची निदर्शने
महाराष्ट्र पूर्व प्राथमिक शिक्षिका, सेविका संघटनेतर्फे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा गटप्रवर्तक, स्वयंपाकी महिला यांनीही दोन दिवस संप पुकारला आहे. कंत्राटी, हंगामी मानधनावर काम करणार्‍या कामगार कर्मचार्‍यांना नियमीत करावे, समान वेतन व राज्य घटनेच्या घटनेच्या कलमाची तरतूद करावी, केंद्र सरकारने जाहीर केलेली वेतन वाढ मिळावी, मिनी अंगणवाडी ताईंना मानधन मिळावे, पेन्शन मिळावी यासाठी महासचिव शौकतभाई पठाण, राज्याध्यक्ष सुजाता रणनवरे, कार्याध्यक्ष वैशाली देवकर, अर्चना अहिरेकर, सुजाता बोबडे, निर्मला पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मोर्चा काढला.
केमिस्ट संघटनेतर्फे हल्लाबोल आंदोलन
सातारा जिल्ह्यातील दोन हजार औषध विक्रेते यांनी आज मुक मोर्चा काढुन जिल्हाधिकारी व अन्य व औषध प्रशासनास निवेदन दिले. ऑनलाईन औषधे ही समाजाच्या हिताची नसून त्यामुळे होणारे दुरुपयोग दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीनेकेमिस्ट संघटनेचे सर्व औषध विक्रेत्यांनी मोर्चा काढला. संघटनेचे अध्यक्ष प्रविण पाटील व इतर पदाधिकारी व सदस्य या आंदोलनात सहभागी झाले होते.
सरकारी कर्मचार्‍यांचे आक्रोश आंदोलन
ऑल इंडिया पोस्टल इम्प्लॉईज युनियन तर्फे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचार्‍यांनी दोन दिवस संप पुकारला आहे. नवीन पेन्शन योजना रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, रिक्त जागा ताबडतोब भरा, सरकारी कामाचे खाजगीकरण रद्द करा तसेच फेडर रिव्हूचा लाभ द्यावा, सातव्या वेतन आयोगातील नियोजित वेतनमध्ये सुधारणा करावी, आदी मागण्यासाठी कर्मचार्‍यांनी आक्रोश आंदोलन केले. या आंदोलनात कर्मचारी सहभागी झाले होते.
भारतीय किसान संघातर्फे निदर्शने
भारतीय किसान संघटनेतर्फे आज देशव्यापी धरणे आंदोलन होत आहे. शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला नाही. भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. 75 टक्के लोभ आपली उपजिवीका शेतीवर करीत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून तृणधान्य, भाजीपाला, फळपिके यांचे उत्पादन शेतकर सातत्याने घेत असतात पण नैसर्गिक आपतीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. छ. शिवजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी 23 कोटी देण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु त्याचा लाभ शेतकर्‍यांपेक्षा बँकांना झाला आहे.
प्रामाणिक कर्जदार शेतकर्‍यांची मात्र किंमत कमी करुन त्याला निराश केले आहे. शेतीमालाच्या हमीभावाची घोषणा फक्त कागदावरच राहीली आहे. नियोजन व माहितीचा प्रचंड अभाव आहे. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.