किसन वीर कारखान्यावर 23 जानेवारीपासून कृषी व पुष्प प्रदर्शन ; साखर आयुक्त संभाजी कडु-पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते उद्घाटन

भुईंज : कारखाना कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी किसन वीर साखर कारखान्याने कार्यस्थळावर 23 ते 25 जानेवारीअखेर कृषी व पुष्पप्रदर्शन आयोजित केले आहे. मंगळवारी (दि.23) सकाळी साडे नऊ वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आणि सहस्त्र वृक्षारोपण कार्यक्रम राज्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडु-पाटील यांच्या हस्ते आणि पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि वाई तालुका अ‍ॅग्री डिलर्स असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 25 जानेवारीअखेर होणार्‍या अखंड नामयज्ञ सोहळ्याचे औचित्य साधून 23 ते 25 जानेवारीअखेर आयोजित कृषी व पुष्प प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास कृषी सहसंचालक महावीर जंगटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. सी. जी. बागल, उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईनकर, जिल्हाअधिक्षक, कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, श्री महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. निलिमा भोसले, लागिरं झालं जी या मालिकेच्या निर्मात्या, सिनेकलाकार श्‍वेता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नामयज्ञ सोहळा व कृषी प्रदर्शनाचे औचित्य साधून कारखाना कार्यस्थळावरील मोलॅसिस टँक फार्म परिसरात नरेंद्र बोर, हनुमान फळ, कवठ, बेल अशा सहस्त्र वृक्षारोपणाचा कार्यक्रम या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शेतकरी, वारकरी, कारखान्याचे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचार्‍यांच्या हस्ते होणार आहे.
आधुनिक शेती तंत्रज्ञानासह विविध रासायनिक,जैविक व सेंद्रिय खते,बि-बियाणे, किटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके, औषधे, अपारंपारिक उर्जा, जलसिंचनपध्दती, रोपवाटीका, हरितगृह, प्रक्रिया उद्योग, पशुपालन, उद्योगाविषयीची माहिती देणारे सुमारे शंभर स्टॉल या कृषि प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. नामयज्ञ सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहणार्‍या कार्यक्षेत्रातील वारकरी, भाविक व शेतकर्‍यांना हे कृषिप्रदर्शन एक पर्वणीच ठरणार आहे.
कृषी प्रदर्शन व पुष्प प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी कारखान्याच्या ऊस विकास कार्यालयाशी  संपर्क साधावा व कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांनी कृषी व पुष्प प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, संचालक मंडळ आणि वाई तालुका अ‍ॅग्री डिलर्स असोशिएशनचे अध्यक्ष सयाजीराव पिसाळ यांनी केले आहे.

लोकाग्रहास्तव पुन्हा खादी महोत्सव
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या खादीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने या पुर्वी तीन वेळा आयोजित केलेल्या खादी महोत्सवास जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. नामयज्ञ सोहळा व कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने पुन्हा खादी विक्री सुरू करावी, असा आग्रह जिल्ह्यातील जनतेकडून झाल्यानंतर त्यांच्या आग्रहास्तव नागपुर येथील महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघाच्यावतीने 22 ते 25 जानेवारी दरम्यान खादीचे कापड, साड्या, बेडशिट, कुर्ता, शॉल आदींची विक्री करण्यात येणार आहे.