अजयकुमार बन्सल यांनी  सातारा पोलीस अधिक्षक पदभार स्वीकारला   

सातारा  :  .नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा आय पी एस पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांनी सातारा पोलीस मुख्यालय येथे पदभार स्वीकारला.त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले तर सातारचे मावळत्या पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांना ह्रद्य सोहळ्यात निरोपही देण्यात आला.

कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस संचालक मनोजकुमार लोहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस परेड ग्राऊंड येथे  यावेळी जिल्हा पोलिस दलाकडून सातपुते यांना निरोप आणि शुभेच्छा देण्यात आल्या.

या भावपूर्ण सोहळ्यात अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाने अनेक गुन्हे उघडकीस आले. या कामाच्या आठवणी सांगताना अनेकांच्या डोळ्यात पाणी होते. सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पोलीसदल एक कुटुंब झाले होते. अशीच भावना या कार्यक्रमात अनुभवयास मिळाली.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या हस्ते जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशाची मूर्ती भेट म्हणून देऊन सातपुते यांचा सत्कार करण्यात आला.

याच कार्यक्रमात  सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सलही दाखल झाले. आयजी मनोजकुमार लोहिया यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यात  पदभार नव्याने स्वीकारलेले सातारा, कोरेगाव, वाई विभागाच्या नूतन पोलीस उपअधिक्षकांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमानंतर नूतन पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल यांनी पोलीस मुख्यालयातील जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.बन्सल हे मूळचे राजस्थानी असल्याने सातारा जिल्ह्यात गेली अनेक वर्षांपासून व्यवसायानिमित्त स्थायिक झालेल्या राजस्थानी बांधवांनीही आनंद व्यक्त करून त्यांचे स्वागत केले.