अजिंक्यतारा साखर कारखान्याचा वजन काटा अचूक

सातारा : आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करत असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यातील ऊस वजन काट्याची दरवर्षी शासनाच्या वैधमापन खात्यामार्फत तपासणी केली जाते. यंदाचा गळीत हंगाम चालू असून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी दिलेल्या आदेशानुसार शासनाच्या भरारी पथकाने मंगळवार दि. 9 जानेवारी रोजी कारखान्यास भेट देवून वजन काट्याची तपासणी केली. सदर तपासणीत अजिंक्यतारा कारखान्याचे वजन काटे अचूक आढळून आले असून तसा अहवाल पथकाने कारखान्यास दिला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत आणि कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, वर्तमानपत्रांमध्ये साखर कारखान्यांच्या ऊस वजन काट्यांवर ऊसाच्या वजनात काटामारी होत असल्याबाबत बातम्या प्रसिध्द होत असतात. त्यामुळे शासनाच्या वैधमापन शास्त्र विभागाकडून दरवर्षी साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची पडताळणी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनावणे, वैधमापन शास्त्र विभागाचे लि. दा. ढवणे, सहायक निरीक्षक आर. एन. गायकवाड, अव्वर कारकून पुरवठा विभाग रणजित जाधव, लेखापरिक्षक श्रेणी 2 आर. ए. चोरगे तसेच रयत क्रांती संघटनेचे प्रकाश साबळे, स्वाभिमानी संघटनेचे प्रतिनिधी रजनीकांत साबळे यांच्या पथकाने शाहूनगर शेंद्रे येथे अजिंक्यतारा कारखान्यास दि. 9 जानेवारी रोजी भेट दिली आणि कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी केली. भरारी पथक येण्यापुर्वी शेतकर्‍यांची ऊसाने भरलेली वाहने वजन करुन गव्हाणीकडे पाठवण्यात आली होती. त्याच वेळी भरारी पथकाने हीच वाहने परत बोलावून त्या- त्या काट्यावर फेर वजन तपासणी केली असता वजन अचूक आणि तंतोतंत आढळून आले. यास्तव भरारी पथकाने समाधान व्यक्त करुन तसा अहवाल कारखान्यास दिला. इतकेच नव्हे तर, ऊस वजनासाठी वापरात असलेले इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांची शासनाच्या वैध मापन शास्त्र विभागाकडून पडताळणी व मुद्रांकीत झाले असल्याचे प्रमाणपत्रासह पथकाच्या निदर्शनास आणून दिले.
कारखान्याकडे स्वत:चे प्रत्येकी 20 कि.ग्रॅम क्षमतेची प्रमाणीत वजने 6 मे.टन इलेक्ट्रॉनिक काट्यावर ठेवून पथकाने तपासणी केली असता, इलेक्ट्रॉनिक काट्यांवरती तंतोतंत वजन दर्शवले. या भरारी पथकाने कारखान्याचे ऊस वजनकाटे अचूक असल्याची खात्री करुन घेतली. काट्यांच्या तपासणीवेळी कारखान्याचे शेती अधिकारी विलास पाटील, केनयार्ड सुपरवायझर संभाजी देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.