अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीचे काम दिशादर्शक : प्रधान सचिव उके

सातारा : स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीत आज उच्चतम प्रतीचे सूत उत्पादन सुरु आहे. सूत गिरणी उद्योगापुढे अनेक अडचणी असतानाही या गिरणीचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कल्पकतेमुळे सूत गिरणीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सूत निर्यात करुन नावलौकिक प्राप्त केला आहे. गिरणीचे काम आदर्शवत असून ते इतर संस्थांंसाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार महाराष्ट्र शासनाचे वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव उज्वल उके यांनी काढले.
 वळसे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीला उके यांनी सदिच्छा भेट देवून गिरणीच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी गिरणीचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन रामचंद्र जगताप, व्हा. चेअरमन हणमंत देवरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सूत गिरणी उद्योगातील अडचणींबाबत माहिती देताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, गेल्या 2-3 वर्षापासून स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सततच्या मंदीमुळे वस्त्रोद्योग अत्यंत अडचणीत आला आहे. कापूस गाठीचा भाव 47 हजार रुपये प्रती खंडी एवढा वाढलेला आहे. सूताचे दर त्या तुलनेत कमी आहेत. बाजारामध्ये सी सी आय कडे कापूस साठा नाही. खाजगी व्यापार्‍यांनी नफेखोरी करण्यासाठी साठेबाजी केल्यामुळे कृत्रीम तुटवडा भासवून कापसाचे भाव वाढविण्यात आले आहेत. बाजारात कापूस गाठी मिळत नाहीत. राज्यातील यंत्रमाग सुध्दा कापडाला भाव नसलेमुळे अडचणीत असून 25 टक्के यंत्रमाग बंद आहेत. यामुळे सूताचे दर कमी होऊन बाजारात मागणी नाही. वीजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेने आपल्या राज्यात दिडपटीपेक्षा अधिक आहेत. या सर्व गंभीर परिस्थीतीमुळे उद्योगातील मानकानुसार उत्पादन क्षमता आणि उत्पादन काढले तरी सुध्दा कच्च्या मालाची किंमत 75 टक्के व प्रचंड वीज खर्च 18 टक्के यामुळे सूत गिरणी आर्थिक अडचणीत आहेत. या परिस्थितीमुळे सर्व सूत गिरण्या येत्या 1-2 महिन्यात बंद पडतील व हजारो कामगार बेरोजगार होतील अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.
प्रधान सचिव उके यांनी सर्व परिस्थीती समजावून घेतल्यानंतर सध्या अडचणीत असणारा वस्त्रोद्योग व्यवसाय अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, तसेच सूत गिरण्यांचे प्रश्‍न प्रलंबीत असून ते सोडवण्यासाठी अधिक वेळ झाला असला तरी आपण यामध्ये तातडीने लक्ष घालून सूत गिरणी उद्योगाच्या स्थैर्यासाठी व सक्षमतेसाठी दुरगामी धोरण व पर्याय वरीष्ठ पातळीवर निश्‍चित करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.
गिरणीचे चीफ अकौंटंट मानसिंग पवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सोलापूर प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक किरण सोनवणे, गिरणीचे संचालक जगन्नाथ किर्दत, बळीराम देशमुख, भरत कदम,  सुरेश टिळेकर, भगवान शेडगे,  विष्णू सावंत, गणपतराव मोहिते, उत्तमराव नावडकर,  गिरणीचे प्रॉडक्शन मॅनेजर उदय औंधकर, मिल इंजिनीयर प्रदीप राणे, विनोद जाधव, राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते