महू-हातगेघर धरणग्रस्तांच्या जमिनी तात्काळ वाटप करणार ; प्रत्येक धरणग्रस्तांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार : जिल्हाधिकारी  ; धरणग्रस्तांनी दिली जिल्हाधिकार्‍यांना साडी चोळीची भेट ; जिल्हाधिकार्‍यांच्या सकारात्मक धोरणाचे धरणग्रस्तांनी केले स्वागत

????????????????????????????????????

सातारा : महू-हातगेघर धरणग्रस्तातील ज्यांना जमिनी मिळाल्या नाहीत त्यांनी तात्काळ उपलब्ध असलेल्या जमिनी पसंतीने निवडाव्यात आणि ज्यांना अर्धवट जमिनी वाटप झाल्या आहेत त्यांना जमिनी दिल्या जातील, बाकी  धरणग्रस्तांच्या इतर अडचणी सोडविण्यास आमचे प्राधान्य राहील. प्रत्येक धरणग्रस्तांच्या वैयक्तिक प्रकरणावर प्रशासन लक्ष देत असून येत्या काही दिवसात हा प्रश्न सुटलेला असेल, असे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी धरणग्रस्तांना आश्वासित केले.
महू-हातगेघर धरणग्रस्तांच्या उपोषणस्थळी जिल्हाधिकार्‍यांनी भेट देवून त्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेवून त्यांचे उपोषण सोडविले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अधीक्षक  अभियंता विजय घोगरे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील, अस्मिता मोरे, संतोष जाधव, जावलीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे आदी उपस्थित होते.
महू-हातगेघर धरणग्रस्तांचे बहुतांशी प्रश्न संपलेले असून ज्यांच्या जमिनीचे वाटप झाले नाही, त्यांच्या जमिनी वाटप करुन दिल्या जातील. ज्या धरणग्रस्तांना जमिनी वाटप झाल्या आहेत मात्र मुळ मालक ताबा देत नाही किंवा वहिवाट देत नाही, त्यावर तात्काळ कारवाई आणि दंडही लावावा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी उपविभागीय अधिकार्‍यांना दिल्या.
धरणग्रस्तांनी विकासासाठी आपल्य जमिनी देवून खुप मोठे योगदान दिलेले आहे, त्यांचे न्याय हक्क त्यांना प्रशासन नियमानुसार मिळवून देईल. एकही धरणग्रस्तांच्या न्याय हक्कावर गदा येणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली. ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांनी उपविभागीय अधिकार्‍यांकडे लेखी अर्ज करावा, आपण स्वत: यात विशेष लक्ष घालून हे प्रकरण तात्काळ मिटवणार असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.
धरणग्रस्तांनी जिल्हाधिकार्‍यांना दिली साडीचोळी भेट
धरणग्रस्तांच्यामध्ये येवून त्यांच्या अडीअडचणी समजून घेवून त्या मार्गी लावणार्‍या   श्‍वेता सिंघल या  या पहिल्या जिल्हाधिकारी असल्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांनी यावेळी सांगितले. या सकारात्मक भूमिकेची दख्ल घेवून धरणग्रस्तानी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची साडीचोळीची भेट देवून सत्कार केला.
महू-हातगेघर धरणात बाधीत झालेल्या खातेदारांची एकूण संख्या 1218 असून पर्यायी जमिन वाटप करण्याचे फक्त 98 खातेदार शिल्लक राहिले आहेत. पैकी 68 प्रकल्पग्रस्त खातेदारांना नियोजन बदलानुसार फलटण तालुक्यातील शिल्लक असलेली जमिनी पसंत नसल्यामुळे प्रलंबीत आहेत तर 30 खातेदारांच्या जमिनी मागणी अर्जानुसार जमिन वाटपाचे काम प्रगती पथावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कावडी गाव हे शंभर टक्के बाधित असून त्यांच्या जमिनी वाटप, वहिवाट, गावठाण हे प्रश्न सोडविण्यास प्रशासन सकारात्मक असल्याचे यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार यांच्या नेतृत्वाखाली धरणग्रस्तांचे आणि धरणाच्या लाभार्थ्यांचे प्रश्नही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी ऐकूण घेतले. धरणग्रस्तांच्या आणि लाभार्थ्यांच्यावतीने दिपक पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. अधिक्षक अभियंता विजय घोगरे यांनी इथून पुढे कॅनॉल ऐवजी बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी दिले जाईल जेणेकरुन पाण्याची गळती थांबेल आणि शेतकर्‍यांच्या जमिनीही बाधित होणार नाहीत, असे सांगितले. श्री. घोगरे यांनी सांगितलेल्या पाण्याच्या गळतीच्या आणि जमिनी बाधित होणार नाहीत या निर्णयाचे दिपक पवार यांनी स्वागत केले.