2017 चा चिरमुले पुरस्कार पद्मभूषण राहुल बजाज यांना जाहीर

साताराः येथील युनायटेड वेस्टर्न बँकेने आपले संस्थापक विमा महर्षी वा.ग. तथा आण्णासाहेब चिरमुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1986 साली चिरमुले चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टमार्फत गेली 20 वर्षे बँकींग, अर्थशास्त्र, उद्योग अशा विविध क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करणार्‍या व्यक्तीला चिरमुले पुरस्कार देवून गौरवण्यात येते. हा पुरस्कार देशभरात मानाचा पुुरस्कार समजला जातो. या पुरस्काराने यापुर्वी ना. मनमोहन सिंग, रतन टाटा, डॉ. नारायण मुर्ती, डॉ.एस.रंगराजन, अरूण शौरी, डॉ. एकनाथ ठाकूर आदी मान्यवरांना गौरविले गेले आहे.

2017 सालासाठी हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती आणि भारतीय उद्योग जगताचे ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या आदरणीय पदभूषण राहुल बजाज यांना जाहीर करण्यात आला आहे.
महात्मा गांधी ज्यांना आपल्या पुत्रासमान मानत अशा जमनालाल बजाज यांच्या घराण्यात त्यांचा जन्म झाला. देशात व परदेशात उच्चशिक्षण प्राप्त केल्यानंतर त्यांनी बजाज ऑटो या आपल्या वडीलांच्या उद्योगात कार्य करण्यास सुरूवात केली. आपल्या कर्तृत्वाने ते वयाच्या केवळ 30 व्या वर्षी 1968 मध्ये बजाज ऑटोचे प्रमुख बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली कधीकाळी आलेल्या अडचणींवर मात करत कंपनीने प्रगतीची घोडदौड केली. आज बजाज ऑटो ही जगातील 4 थ्या क्रमाकांची स्कूटर, रिक्षा आणि मोटार सायकल बनवणारी बलाढय आणि अग्रेसर कंपनी झाली आहे. सातत्याने संशोधन करून उत्पादनाचा दर्जा सुधारणे आणि विश्‍वमान्यतेचा लौकीक मिळविणे हे कंपनीने साध्य केले आहे. या सगळयामागे राहुल बजाज यांचे कर्तृत्व आणि दुरदृष्टी आहे.
उद्योगजगत आणि भारत सरकारने त्यांच्या नेतृत्व गुणांची सातत्याने दखल घेतली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज या पाच हजार भारतीय कंपन्यांच्या शिखर संस्थेचे दोनवेळा अध्यक्षपद भूषविण्याचा आगळावेगळा सन्मान त्यांना मिळाला आहे. उद्योजकांचे प्रश्‍न परखडपणे सरकारपुढे मांडून ते सोडविण्याचा त्यांचा लौकीक आहे. त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी सरकारनेही त्यांची ऑटोमोबाईल डेव्हलपमेंट कौन्सिलवर चेअरमन म्हणून नियुक्ती केली होती. त्याचबरोबर 1986 ते 1989 या काळासाठी इंडियन एअरलाईन्सचे चेअरमन म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले होते. त्यांनी विविध सेमीनार्स, व्याख्याने, चर्चासत्रे, मुलाखती यामधून उद्योजक आणि लहान व मध्यम उद्योजक यांना मार्गदर्शन करून नवीन दिशा दिली आहे. त्याचबरोबर बजाज कुटूंबाची राष्ट्रीय आणि सामाजिक कार्याची परंपरा जोपासत त्यांनी ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रासाठी विविध ट्रस्टद्वारे सढळ हाताने मदत केली आहे.
त्यांच्या या महान योगदानाबद्दल भारत सरकारचा पदभूषण पुरस्कार, राष्ट्रभूषण अवॉर्ड, लोकमान्य टिळक पुरस्कार, हॉर्वर्ड बिझनेस स्कूल अमेरिकेचा पुरस्कार, मुंबई मॅनेजमेंट असोसिएशन अ‍ॅवार्ड, इंडियाज बिझनेसमन ऑफ द ईयर अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे.
रू. एक लाख आणि सन्मानपत्र असे चिरमुले पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच तो एका अनौपचारिक समारंभात राहुल बजाज यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती चिरमुले ट्रस्टचे विश्‍वस्त श्रीकांत जोशी, डॉ. अनिल पाटील, समीर जोशी, डॉ. अच्युत गोडबोले व दिलीप पाठक आणि पुरस्कार समितीचे निमंत्रक, माजी विश्‍वस्त अरूण गोडबोले यांनी दिली आहे.