शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या सत्कार सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे : आ. शशिकांत शिंदे

कराड :आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या संसदीय कारकिर्दीस 50 वर्षे पूर्ण झाली, त्याची दखल भारत सरकारने घेवून पवारसाहेबांना पद्मविभूषण पदवी बहाल केल्याबद्दल सातारा जिल्हा वासियांच्यावतीने नागरी सत्कार सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.कराड येथील अष्टविनायक मंगल कार्यालय येथे सत्काराच्या नियोजनासाठी बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठक प्रसंगी ते बोलत होते.
आमदार शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, केंद्रात कृषि मंत्री पदावर काम करताना देशाच्या कानाकोपर्‍यात नांव कोरून ठेवण्यासारखे काम केवळ खा.शरद पवारसाहेब यांनीच केले. देशातील सर्व शेतकर्‍यांना कर्जमाफी देवून सातबारा कोरा करण्याचे फार मोठे काम केले आहे. पवारसाहेब यांनी मुंबईतील गिरणी कामगार, साखर कामगार, ऊस दर, तूर खरेदी दर, कांदा, कापूस खरेदी दराबाबत योग्य मार्ग काढून शेतकर्‍यांसह ग्राहकांना परवडेल अशा प्रकारे मध्य मार्ग काढून जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे. देशात कृषिमंत्री असताना उत्पादन वाढीसाठी नविन प्रयोग कृषि खात्याला करून देश अन्नधान्यासाठी सक्षम बनवला आहे. संरक्षणमंत्री असताना सैन्यदलातील त्रुटी कमी केल्या आणि परराष्ट्रमंत्री असताना जगातील सर्व राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध तयार करून देशात माहिती आणि तंत्रज्ञानामार्फत शैक्षणिक प्रगती होण्यासाठी प्रयत्न आहे. अशा या नेत्याच्या सत्कार सोहळ्यासाठी आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.
याप्रसंगी आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, राजेश पाटील-वाठारकर, सातारा जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष सुनिल माने, माजी जि.प.सदस्य राजाभाऊ पाटील-उंडाळकर, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार बटाणे, जयंत पाटील (काका), निवासराव पाटील (आण्णा), वसंतराव पाटील-कोरेगांवकर, कराड पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, प्रणव ताटे, सुहास बोराटे, कारखान्याचे संचालक संजय जगदाळे, भास्कर गोरे, तानाजीराव जाधव, डी.बी.जाधव, माणिकराव पाटील, पी.डी.पाटील (दाजी), लालासोा पाटील, जयवंत मोहिते इ.कराड तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व आजी माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
आनंदराव पाटील म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येवून पुर्णत: देशाच्या सेवेसाठी वाहून घेवून सलग 50 वर्षे संसदीय कारकिर्द पूर्ण करणे एवढी सोपी गोष्ट नाही. देशात बर्‍याचदा चढउतार नेत्यांना बघावे लागले. परंतु पवार साहेबांनी सर्वसामान्य शेतकर्‍यांना न्याय देवून कर्जमुक्त करण्यासाठी देशाचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या सहकार्याने शेतकर्‍यांचे हित जोपासले आहे. त्या गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सातारकरांच्याकडून नागरी सत्कार करण्याचे ठरले, त्यास पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनीही पुढाकार घेतला आहे, असे सांगून काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने माझ्यावर जी जबाबदारी आपण द्याल ती मी पुर्ण करेन अशी ग्वाही आमदार आनंदराव पाटील यांनी यावेळी दिली.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले की, आधुनिक महाराष्ट्राराचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या विचाराचा वारसा जपून महाराष्टा्रत कृषि औद्योगिक क्रांती निर्माण केली आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतात कोणत्याही राज्यात संकटे आली तर पवारसाहेबांनी वैयक्तिक लक्ष देवून प्रश्‍न सोडविण्याचे काम केले आहे. साखर कामगार वेतनवाढ, ऊस तोडणी मजूरांच्या वेतनवाढीशिवाय, गिरणी कामगार असो किंवा अन्य जे जे प्रश्‍न त्यांच्यासमोर आले त्याची सोडवणूक समन्वयाने सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यांच्या संसदीय कारकिर्दीस 50 वर्षे पूर्ण झाल्याची दखल भारत सरकारने घेवून पद्मविभूषण पदवी बहाल केल्याबद्दल सातारा येथे सत्कार सोहळा होणार आहे. त्या सोहळ्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग घेतला आहे. याबाबत शनिवार दिनांक 28/10/2017 रोजी पालकमंत्री नामदार विजय शिवतारे (बापू) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
त्यानुसार नियोजन प्रत्येक तालुक्यातून बैठक घेवून नियोजन करण्याची सुचना होती. त्यानुसार आजची बैठक घेतलेली आहे. आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
यावेळी जनता सह.बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर, राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांनी भाषणे झाली.सुत्रसंचालन पराग रामुगडे यांनी केले, नंदकुमार बटाणे यांनी आभार मानले.