भरत फडतरे व त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईस मंजूरी

फलटण : फलटण शहर व तालुक्यात दरोडा, चोरी, जबरी चोरी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करून उच्छाद मांडणार्‍या, भरत फडतरे व त्याच्या टोळीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. प्रकाश सावंत यांनी दिली आहे.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सातारा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर, तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कान्वये कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. फलटण पोलीस उपाधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी भरत फडतरे टोळीवर मोक्क्याचा अहवाल पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दि. 16 सप्टेबर रोजी प्रस्तावास मान्यता दिली. त्यानुसार आज भरत लक्ष्मण फडतरे रा. मलठण ता. फलटण, विजय दत्तू ननवरे रा. आखरीरस्ता, वडर गल्ली, मंगळवार पेठ फलटण, स्वप्निल गुलाब जावळे रा. बोरी ता. खंडाळा यांच्यावर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे.
भरत फडतरे याच्यावर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. तर विजय दत्तू ननवरे याच्यावर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. स्वप्निल गुलाब जावळे याच्यावर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, असे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील फडतरे व ननावरे हे वेगवेगळ्या गुन्ह्यात सातारा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. तर स्वप्नील जावळे हा नुकताच जामिनावर सुटला असल्याची माहिती पो.नि. सावंत यांनी दिली आहे.
भरत फडतरे टोळीवर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे, फलटण पोलीस उपाधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार  फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सावंत यांनी याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार आज भरत फडतरे व त्याच्या दोन साथीदारांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे.