महायुतीच्या विरोधात मनोमिलनाचे सर्जीकल स्ट्राईक

सातारा जिल्हयाच्या राजकारणात मोठया तयारीने उतरलेल्या भाजपाला कडवी टक्कर देण्यासाठी सातारा शहरात मनोमिलनाने दोन्ही आघाडयांचे मनोमिलन होणार की नाही या प्रश्‍नांचा सन्पेंन्स ताणत जणू राजकारणातील सर्जीकल स्ट्राईक चालवली आहे. सातारा विकास आघाडी विरूध्द नगरविकास आघाडी असा आमनासामना असला तरी शहरामध्ये भाजप, रिपाई, शिवसेना ही एकत्र येवू पाहणारी तिसरी युती ही खरी निशाणा आहे. सातार्‍यापासून मुंबईपर्यंत खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे या दोन्ही नेत्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. दोन्ही आघाडयांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला प्रतिसाद द्यायचा नाही हे लढाईच्या पहिल्या टप्प्यातील तयारीचे सुत्र आहे. मग नामनिर्देशनाला सुरवात झाली की अटीशर्तीचा खलिता धाडायचा आणि ऐनवेळी निवडणूकीआधी किंवा नंतर राजकीय रागरंग बघून मनोमिलनाचा निर्णय जाहीर करायचा हे मनोमिलनाचे अघोषित सर्जीकल स्ट्राईकच सातार्‍यात सध्या सुरू आहे. तिसरी आघाडी व महायुती यांना बेसावध ठेवून खिंडीत गाठण्यासाठी दोन्ही आघाडयांनी स्वबळाच्या जोरबैठका काढायला सुरवात केली आहे. दोन्ही आघाडयांची चाळीस उमेदवारांची स्वतंत्र यादी तयार असून आमने सामने लढतीसाठी ते सज्ज झाले आहेत.
मंगळवार तळयावर नाकाबंदी
वॉर्ड क्रं. 17 व 18 या दोन्ही वॉर्डात नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम यांची कोंडी करण्यासाठी सातारा विकास आघाडीने मजबूत फिल्डिंग लावण्याचा घाट घातला आहे. वॉर्ड क्रं 18 मधून आण्णा लेवे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली तरी इलेक्शनंतर त्यंाचा कल हा सातारा विकास आघाडीकडे झुकणार आहे हे स्पष्ट होणार आहे. शेजारच्या वॉर्डातून राजू गोडसे व हेमांगी जोशी यांच्या उमेदवारीमुळे सातारा विकास आघाडीने तळयावर नगरविकासची तटबंदी भेदल्याची चर्चा सुरू झाली आहे. नगरविकासचे येथील पर्याय कोणते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मोहिते विरूध्द अहिरराव
वॉर्ड क्रं. 15 म्हणजेच शनिवार पेठेचा पुर्वेकडील भाग व माची गावठाण यामध्ये पसरलेला वॉर्ड क्रं.15 रंगतदार लढतीचा ठरू शकतो. आमदार गटाचे कट्टर समर्थक अमोल मोहिते यांनी पुन्हा स्वतःची दावेदारी सांगितली आहे. मात्र उदयनराजे यांनी मनोमिलनाच्या अटीशर्तीमध्ये दादा नगरसेवकांच्या नावावर फुली टाकण्याची सुचना आमदारांना दिली होती. उदयनराजे यांचे समर्थक प्रशांत अहिरराव यांनी येथून स्वतःचा दावा सांगितला आहे. त्यामुळे मोहिते विरूध्द अहिरराव असा सामना रंगणार असला तरी त्याला भाजपच्या सागर पावशे यांचा तिसरा कोन आहे. पावशे व अहिरराव यांची वॉर्डात एक एक प्रचारफेरी पूर्ण झाली आहे. त्यामुळे काटयाची लढत येथे रंगणार हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतीषाची गरज नाही.
वेदांतिकाराजेंच्या नगराध्यक्ष पदाचा सन्पेंन्स
सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद खुले झाल्यापासून राजघराण्याकडे अपेक्षेने बघितले जावू लागले. आणि शिवेंद्रराजे यांच्या पत्नी व कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यांनी शहरातील सर्व मिळकतींचे ना हरकत दाखले व थकबाकी शुन्य असल्याचे दाखले काढून नेल्याने नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अद्याप दोन्ही आघाडयांच्या मनोमिलनाची चर्चा झाली नाही. तरीपण नगराध्यक्ष पद राजघराण्यात रहावे हा सुध्दा आग्रह आहेच. त्यामुळेच वेदांतिकाराजेंच्या नगराध्यक्ष पदाची रिस्क ही तितकीच वाढली आहे त्यांच्या विरोधात महायुतींने लॉबी सक्रिय केली असून शुक्रवार पेठ, तेली खडडा, भोसलेमळा, शाहुनगर, गोडोली यासारख्या भागातून किती मतदान होवू शकते याची गोपनीय पडताळणी सुरू झाली आहे.उदयनराजेंनी मनोमिलनावर कोणतेही भाष्य केलेले नाही. दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र अर्ज भरण्याच्या सुचना केल्याने इच्छुुकांनी मनोमिलाची वाट न बघता अर्ज भरायला सरूवात केली आहे. 2006 साली दोन्ही आघाडया आमने सामने लढल्या होत्या. 10 वर्षानंतरही तीच परिस्थिती आहे. फरक इतकाच मनोमिलन होवूनही भाजपच्या शिरकावामुळे दोन्ही आघाडयांना स्वबळाची भाषा बोलावी लागली आहे. या सर्जीकल स्ट्राईकचा कितीसा उपयोग होईल याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.