विद्यार्थी घडवा, राष्ट्र सक्षमपणे घडेल ! अरुण जावळे पुरस्काराने सन्मानित

सातारा : भारतीय समाजव्यवस्थेत परिवर्तन घडविण्याबरोबरच राष्ट्र मजबूत करायचे असेल तर नव्या पिढीचा अर्थात विद्यार्थ्यांचा प्राधान्याने विचार झाला पाहीजे. प्रत्येक एक नवी पिढी एक नवे राष्ट्र असते आणि त्या राष्ट्राची स्वंतत्र अशी एक परिभाषा असते. म्हणून नव्या पिढीचे नेतृत्व करणारा आजचा विद्यार्थी टिकला व घडला पाहीजे तरच राष्ट्र टिकू आणि सक्षमपणे घडू शकेल असा विचार विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर, औरंगाबाद येथे बहुजन विचार मंचच्या वतीने अरुण जावळे यांना पंचवीस हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह अशा स्वरुपाचा मविचार गौरव पुरस्कारफ माधव बोरडे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मान सोहळ्यात अरुण जावळे बोलत होते. यावेळी बहुजन विचार मंचचे प्रमुख डॉ. विलास जोंधळे, द पीपल्स पोस्टचे संपादक चेतन शिंदे,  डॉ. राहूल म्हस्के, प्राचार्य अभिजित आल्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कूलगुरु डॉ. बी.ए. चोपडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार होता, तथापी दिल्ली येथून येण्यास विलंब होत असल्याने संत कबीर शिक्षण संस्थेचे संस्थापक व औरंगाबाद येथील अत्यंत जेष्ठ व आदरनीय व्यक्तिमत्त्व  माधव बोरडे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. दरम्यान कार्यक्रमास उपस्थित रहाता येत नसल्यामुळे कूलगुरुंनी दिलगिरी व्यक्त या सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बहुजन विचार मंचचे प्रमुख डॉ. विलास जोंधळे आपल्या प्रास्तविकपर भाषणात म्हणाले, 7 नोव्हेंबर 1900 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत पाऊल टाकले ही घटना क्रांतिकारक आहे. या घटनेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अरुण जावळे यांनी तब्बल पंधरा वर्ष न थकता, न थांबता अनेक अडचणींवर मात करुन शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेशदिनाचा जागर करत 7 नोव्हेंबर हा दिवस राज्यभर सर्व शाळा, महाविद्यालयातून साजरा व्हावा यासाठी शासनाकडे आग्रह धरला. त्यामुळे शासनाला गतवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस मविद्यार्थी दिवसफ म्हणून घोषित करावा लागला. अरुण जावळे यांच्या या प्रयत्नांमुळे निश्चितपणे एक चांगला दिशादायक उपक्रम हाती आला आहे, असे सांगत महाराष्ट्राच्या दिशादायक वाटचालीत योगदान देणार्‍या अरुण जावळे यांच्यासारख्या  साहित्यिकांच्या पाठीशी महाराष्ट्राने उभे रहायला पाहीजे, अशी भावनाही डॉ. जोंधळे यांनी व्यक्त आहेत.
द पीपल्स पोस्टचे संपादक चेतन शिंदे यांनीही आपल्या भावाना व्यक्त केल्या. ते म्हणाले, अरुण जावळे यांच्या योगदानामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षितिजावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिवस उगवला. अवघ्या आंबेडकरी चळवळीला यामुळे एक नवा उत्साह गवसला. शालेय शैक्षणिक चळवळीला जबरदस्त ऊर्जा प्राप्त झालीय. आता या दिवसाचे गांभीर्य आणि महत्त्व हे केवळ महाराष्ट्र सरकारपुरतेच राहीले पाहीजे किंवा शासनानेच राखलं पाहीजे असे अजिबात होता कामा नये. याउलट हा दिवस महाराष्ट्राचा उत्सव झाला पाहीजे यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहायला हवे. यावेळी डॉ. राहूल म्हस्के, श्रावण गायकवाड यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.