दिपक धुमाळ यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

औंध : औंध येथील दिपक धुमाळ यांना श्री यमाई देवी मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचे सुमारे सत्तर हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे सोन्याचे ब्रेसलेट सापडले होते. त्यांनी ते त्या भाविकाला प्रामाणिकपणे परत केल्याने त्यांचे औंध परिसरात कौतुक केले जात आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, रविवारी सुट्टी असल्याने दिवसभर औंध गावातील श्री यमाईदेवी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी होती. दुपारी 1 च्या सुमारास माण तालुक्यातील देवीचे एक भक्त दर्शनासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांचे अडीच तोळयाचे सोन्याचे ब्रेसलेट बाहेरील नंदीजवळ पडले होते. ते ब्रेसलेट तेथे प्रसादाचे साहित्य विकणार्‍या दिपक धुमाळ यांना सापडले.काही वेळानंतर ते भक्त गण त्याठिकाणी आपले हरवेलेले ब्रेसलेट शोधण्यासाठी परत आले. त्यानंतर त्याठिकाणी असणार्या दिपक धुमाळ यांनी त्यांच्याकडून ब्रेसलेटची सविस्तर माहिती घेतली. ब्रेसलेटवरील खाणाखुणा विचारल्या ते ब्रेसलेट त्या भक्तगणाचे आहे. ही खात्री झाल्यानंतर धुमाळ यांनी प्रामाणिक पणे त्या भक्त गणाकडे ते सुपुर्द केले. धुमाळ यांचा प्रामाणिक पणा पाहून ते सद्गदीत झाले. हातावर पोट भरणार्या दिपक धुमाळ यांनी आपल्या प्रामाणिकपणातून समाजामध्ये माणुसकी, सच्चाई अजून ही जिवंत असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या प्रामाणिक पणा बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.