बेळगाव येथील भीषण अपघातात सातारचे दोघे ठार

बेळगाव :  पुणे-बेळगाव महामार्गावर स्वीफ्ट कारवर गॅस सिलेंडरचा ट्रल पलटी होऊन झालेल्या भीषण आपघातात सातारचे दोघे जागीच ठार झाले. तर दोघे जखमी झाले आहेत. महालिंग दत्तात्रय खराडे (वय 55, रा. वाई, सातारा) व संजय सुरेश शिंदे (वय 45, रा. बोरगाव, सातारा) अशी मृतांची नावे आहेत. किशोर गाडे (वय 37, रा. कोरेगाव, सातारा) व दिगंबर गाडे (वय 37, साखरवाडी, सातारा) हे दोघे जखमी झाले आहेत. ही घटना आज-गुरूवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद बगेवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महालिंग खराडे हे स्वीफ्ट कारमधून आपल्या अन्य तीन सहकार्यांसह तिरूपती येथे दर्शनासाठी निघाले होते. सकाळी साताराहून ते रवाना झाले. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते बेळगावपासून 16 कि. मी. अंतरावर असलेल्या बडेकोळमठ येथे आले. या ठिकाणी मोठा उतरा आहे. या उतारावरच काही वेळापूर्वी एक दुधाचा पिकअप टेम्पो पलटी झाला होता.

रस्त्यावर प्रचंड दुध सांडले होते. हे दृश्य पाहतचा स्वीफ्टमधील चालकाने कार थांबविली. यावेळी पाठीमागून नवीन गॅस सिलेंडर घेऊन घेणार्‍या ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला. पाऊस पडल्याने आणि मोठा उतार असल्याने हा ट्रक पलटी झाला आणि थेट स्वीफ्ट कारवर येऊन आदळला. यामध्ये मागच्या बाजूला बसलेले महालिंग खराडे व संजय शिंदे हे जागीच ठार झाले. तर किशोर गाडे व दिगंबर गाडे हे जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच बगेवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक तरूणांच्या मदतीने त्यांनी रिकामे गॅस सिलेंडर हटवून कारमधील मृतदेह बाहेर काढले. जखमींना शासकीय रूग्णालयात दाखल केले आहे.