भादेनंतर आता दोन बिबट्यांचा मुक्काम वाठारमध्ये!

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील अंदोरी परिसरात वावरणार्‍या बिबट्याच्या दहशतीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या सहा दिवसांपासून संपूर्ण पंचक्रोशीत केवळ बिबट्याच्याच चर्चा होत आहेत. भीतीपोटी शेतकरी वर्ग घराबाहेर पडायला धजावत नाही. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. भाजीपाला जागेवरच आहे. त्यामुळे एरव्ही काळ्या आईच्या सेवेत रमणारा शेतकरी आता रानाकडे डोळे लावून बसला आहे.
दरम्यान, वनविभागाने कसून शोध सुरू केला असला तरी बिबट्याच्या पायाच्या ठशांव्यतिरिक्त त्यांच्या हाती काही लागले नाही.
खंडाळा तालुका हा तसा दुष्काळी पट्ट्याचा भाग. इथं पाळीव जनावरांपलीकडे कधीच कुठल्या प्राण्यांशी संबंध आला नाही; मात्र नीरा नदीच्या उजव्या कुशीत असणार्‍या अंदोरी गावातील रुई शिवारात रविवारी सायंकाळी अचानक बिबट्याचे दर्शन झाले आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यातच त्याने कुत्र्यांवर हल्ला करून फडशा पाडला तर माणसांवरही हल्ला केला. त्यामुळे लोकांमध्ये बिबट्याची चांगलीच दशहत पसरली.
बिबट्याचा वन विभागा कडून कसून शोध सुरू असला तरी त्याच्या पायाच्या ठशांव्यतिरिक्त काहीच हाती लागले नसल्याने तो कुठे असेल याची धास्ती लोकांमध्ये आहे. रोज नित्यनियमाने रानात जाणार्‍या लोकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. साहजिकच शिवारात माणसांचा कुठेही बोलबाला नाही.त्यातच अंदोरीसह भादे-वाठार परिसरातही दोन बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून आल्याने या गावांमध्ये खळबळ उडाली आहे. रानात कुठे नजरेला पडला तर लगेचच त्याचा गावभर गोंगाट होतोय. त्यामुळे बाहेर पडणे जिकिरीचे बनत आहे.
अंदोरीच्या शिवारात सध्या उसाचे मोठे पीक आहे. त्यातच अनेक ठिकाणी उसाची लागवड सुरू आहे. मात्र, काढलेल्या सरीमध्ये टाकलेली उसाची बेणं तसेच ठेवून मजूर घरीच आहे. सध्या बाजारामध्ये टोमॅटो, भेंडी या पिकांना चांगला दर आहे. मात्र, शेतामध्ये पिकलेली टोमॅटो किंवा तोडणीला आलेली भेंडी काढण्यासाठी कुणीही फिरकेना झालेत. लाख मोलाचा माल शिवारात पडून आहे. तसेच उसाच्या मोठ्या पिकाला पाणी देण्यासाठीही जायला शेतकरी तयार होत नाही. शेतकर्‍यांजवळ असणारी दुभती जनावरंही रानात चरायला घेऊन जाणे मुश्किल झाले आहे. रानात ओला चारा, हिरवेगार गवत असतानाही गाय, बैल यांना घरीच गोठ्यात बांधून ठेवण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. उसाची लागवड असो, वा पिकांची खुरपणी. शेतमजूर शेतात जायला तयार होत नाहीत. त्यामुळे शेतकरीराजाही अडचणीत आलाय. या बिबट्याचं करायचं काय? असा प्रश्न सर्वांपुढेच पडला आहे.