जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर भाजपचे वर्चस्व

सातारा : सातारा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांच्या निवडी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जाहीर केल्या आहेत. या निवडीवर बहुतांशी प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व राहिले असून 28 अशासकीय सदस्यांपैकी 18 सदस्य भाजपचे आहेत. दरम्यान या सर्व सदस्यांना शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून आवश्यक त्या नियमावलीची माहिती देण्यात आली.
सातारा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अखत्यारीत कार्यरत राहणार असल्यामुळे यावर काम करण्याची संधी मिळावी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही त्यांच्या कार्यकत्र्यांना संधी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली होती. मात्र, या सर्व निवडीच्या अनुषंगाने अन्न पुरवठा व नागरी मंत्री गिरीश बापट यांनी यावर बारकाईने नजर ठेवली होती. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत. जिल्हा ग्राहक न्यायमंच अधिकारी, पोलीस अधीक्षक, साहाय्यक नियंत्रक वैधमापन, साहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन, आरोग्य अधिकारी, कार्यकारी अभियंता दूरसंचार विभाग, कार्यकारी अभियंता महावितरण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
ज्या अशासकीय सदस्यांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये ग्राहक संघटनेचे उर्मिला येळगावकर, दिलीप पाटील, दिलीप भोसले, मोहन कुलकर्णी, प्रल्हाद कदम, जयदीप ठुसे, विजयकुमार कुलकर्णी, रंगराव जाधव, सुनीता राजेघाटगे, केदार नाईक हे दहा प्रतिनिधी आहेत. उर्वरित नऊ गटांना प्रत्येकी दोन सदस्य असे प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामध्ये राजेंद्र कासट, निलकंठ पालेकर (व्यापार व उद्योग), अरुणा बिडवे, सुजाता पवार (शाळा व महाविद्यालय), रितेश रावखंडे, श्रीकांत पाटील (पेट्रोल व गॅस प्रतिनिधी), विक्रमसिंह कणसे, जोतिराम ढाणे (शेतकरी), विद्या पावसकर, मिलिंद काकडे (नगरपालिका), मनोज घोरपडे, सुवर्णा देसाई (जिल्हा परिषद), तानाजी काटकर, विजया गुरव (पंचायत समिती), शोभा काळेल, विठ्ठल गायकवाड (बाजार समिती), संगीता चव्हाण, शरद जगताप (वैद्यकीय) यांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्व सदस्यांना जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी शुभेच्छा दिल्या असून शुक्रवारी सर्व  सदस्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे सातारा नगरपालिकेतील गटनेते धनंजय जांभळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.