महाडजवळ पूल गेला वाहून; दोन एसटी बसेस तसेच इतर वाहने वाहून गेल्याची भीती

रायगड : महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्यानं दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे.  पूल वाहून गेल्यानंतर आता बचावकार्य सुरू झालेले आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाल्याने तीन बोटींसह ही टीम आता वाहून गेलेल्या वाहनांचा शोध घेत आहे. तसेच हेलिकॉप्टर्स देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्यासाठी कोस्टगार्डचीही मदत घेतली जात आहे. जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरीवली या दोन बस आहेत. त्यामध्ये एकूण चालक-वाहकसह २२ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. पोलादपूर ते  महाड  हे १७ किलोमीटरचं अंतर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ राजेवाडी इथं सावित्री नदीवर ब्रिटीशकालीन हा पूल होता. या घटनेत इतरही वाहनं वाहून गेल्याची भीती व्यक्त होते आहे.