कर्करोग जनजागृती सप्ताह प्रभावीपणे राबवून दंडात्मक कारवाई करा: यादव

सातारा :   मौखिक, डोके, मान व चेहरा यांचा कर्करोग दिनाच्या अनुषंगाने सप्ताह राबवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. त्याचबरोबर तंबाखू नियंत्रण कायदा प्रभावीपणे राबवून दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिल्या.
27 जुलै  हा जागतिक मौखिक, डोके मान व चेहरा यांचा कर्करोग दिन म्हणून 1 ऑगस्ट पासून  कर्करोग जनजागृती सप्ताह राबविण्याबाबत आज बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्वला माने, मौखिक कर्करोग तज्ञ डॉ. अशोक मोरे, दंत शल्यचिकित्सक डॉ. विजया जगताप, पोलीस उपअधीक्षक खंडेराव धरणे, डॉ. अशोक पोळ, तहसीलदार विवेक जाधव, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक आसिया पट्टणकुडे, अन्न सुरक्षा अधिकारी राहूल खंडागळे आदी उपस्थित होते. सोमवार दि.1 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर मौखिक कर्करोग तज्ञ डॉ. अशोक मोरे यांचे तंबाखुच्या दुषपरिणामाबाबत मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर 2 ऑगस्ट रोजी येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात सकाळी 10 ते 2 दंत शल्यचिकित्सक व कान, नाक, घसा तज्ञ यांच्या मदतीने मौखिक कर्करोग आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. या शिबीरात डॉ. मनोज लोखंडे, डॉ. सुजीत भोसले हे तपासणी करणार आहेत.
त्याचबरोबर तालुकास्तरावरही विविध जनजागृती शिबीर तसेच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मार्गदर्शन करतांना अपर जिल्हाधिकारी श्री. यादव पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या सिगारेट अन्य तांबखुजन्य उत्पादने कायदा 2003 (सीओटीपीए) प्रभावीपणे राबविण्यात यावा. त्याचबरोबर होणार्‍या दुष्परिणामाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.