राजेंद्र चोरगेंच्या विकासकामांना भाजपाचे पाठबळ ; ना. चंद्रकांतदादा पाटील यांची चोरगेंच्या निवासस्थानी भेट

सातारा : सातार्‍यात दोन्ही राजांचे मनोमिलन तुटल्यानंतर भाजपाने चांगलेच ठाण मांडायला सुरूवात केली आहे. दरम्यान, राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘बालाजी’चे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्या निवासस्थानी भेट देवून तुमच्या सामाजिक व विकासात्मक कामांना यापुढे भाजपाचे तसेच राज्य-केंद्र शासनाचे पाठबळ राहील, असे आश्‍वासन दिले. या दोघांच्यात सुमारे तासभर चाललेल्या चर्चेतुन शहर व जिल्ह्यातील कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी भाजपाचे दीपक पवार, अमित कुलकर्णी, दत्ताजी थोरात, शहराध्यक्ष सुनिल काळेकर, नगरसेवक विजय काटवटे, नगरसेवक धनंजय जांभळे, तसेच बालाजी ट्रस्टचे संजय कदम, नितीन माने, उदय गुजर, जगदीश खंडेलवाल, राजूशेठ खंडेलवाल, मधुकर जाधव, आनंद गुरव, दीपक वेताळ, हरिदास साळुंखे, संतोष शेंडे आदी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट दिली तेव्हा राजेंद्र चोरगे व बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विविध ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विविध विकासकामांची त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर पाटील म्हणाले, बर्‍याच दिवसांपासून मी राजेंद्र चोरगे यांच्याविषयी ऐकून होतो. अनेकवेळा फोनवर बोलत होतो पण यावेळी निर्णय केला की आता त्यांच्या घरी जाऊनच भेटायचे. त्याप्रमाणे भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत की, मुख्यमंत्री फडणवीस असोत. आता केवळ सरकारवर अवलंबून राहू नका. नव्याने टॅक्सेस वाढवता येणार नाहीत. त्यामुळे ट्रस्ट, संस्था यांच्या माध्यमातूनच काही कामे उचलली पाहिजेत. ही कल्पना पुढे येत आहे. आणि नेमकी हीच योजना घेऊन राजेंद्र चोरगे गेली कित्येक वर्षे काम करत आहेत. राजेंद्र चोरगेंच्या या दृष्टीने कैलास स्मशान भूमीच्या माध्यमातून महाराष्ट्रात लौकिक मिळवला आहे. नगरपालिकेचे किंवा शासनाचे कोणतेही सहकार्य नसताना केवळ स्वनिधीतून सातारकराची सुरु असलेली ही जनसेवा राज्यातील एकमेव उदाहरण असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद केले.
यावर मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, संपुर्ण देशाला विकासाच्या वाटेवर आणून महासत्ता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहोरात्र काम करत आहेत. तर राज्यातही फडणवीस सरकारने सकारत्मक कामांची बांधणी घेतली आहे. आपल्याला याच विचारधारेवरील विकासकामांना या दोन्ही सरकारकडून कायमच सहकार्य राहील.  आपल्या माध्यमातून यापुढेही विकासात्मक कामांचा जोर असाच वाढत रहावा, अशा शुभेच्छाही यावेळी दिल्या.
अधिवेशन संपताच मोठी जबाबदारी देणार
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, इतके मोठे काम उभे करूनही राजकीय व सामाजिक जीवनात इतके मागे का राहिले, असे मला वाटते. आम्ही आता असे वैशिष्टपुर्ण काम करणार्‍यांना आमच्यामध्ये योग्य ती जबाबदारी देण्यात येणार आहे. अधिवेनश संपताच त्याचा आम्ही तातडीने विचार करू. केवळ राजकारण नको, समाजकारण अधिक महत्वाचे, आणि ते सध्या बालाजीच्या माध्यमातून करत आहेत, याचा मी आनंद व्यक्त करतो.