छ. प्रतापसिंह हायस्कूलला आंतरराष्ट्रीय दर्जा द्याः अरुण जावळे

 

सातारा :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बालपण साता-यात गेले. येथूनच ख-या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल येथे इयत्ता पहिलीमध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. येथे चार वर्षे या हायस्कूलमध्ये बाबासाहेब शिकले त्यामुळे ही शाळा देशाची अस्मिता आहे. मात्र सातारा जिल्हा परिषदेच्या कारभारामुळे या शाळेला दिवसेंदिवस बिकट परिस्थितीशी सामना करावा लागतोय. तेव्हा, या शाळेची परवड रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे हायस्कूलच ताब्यात घेऊन शिक्षण मंत्रालयाच्या विशेष यंत्रणेमार्फत चालवावे आणि त्यास ‘आंतरराष्ट्रीय’ स्वरुप प्राप्त करून द्यावे, अशी आग्रही मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदनही मुख्यमंत्र्यांना त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत दिले आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, ७ नोव्हेंबर १९०० रोजी त्यांनी छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेश घेतल्यामुळे हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून शासन स्तरावर साजरा होत आहे. व्यक्तिशः मी यासाठी मागील १५ वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला होता. या आग्रहाला दाद देत सरकारने २०१७ ला हा विद्यार्थी दिवस घोषित केला. आता हा विद्यार्थी दिवस लवकरच भारतभर साजरा होणार असून त्यासाठी दिल्ली दरबारी हालचाली सूरु आहेत. केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याशी ‘सविधान’ या निवासस्थानी भेटून तशी चर्चाही केली आहे. डॉ. राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या नावाने शिक्षक दिन व डॉ.अब्दूल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो, तसा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संपूर्ण भारतात विद्यार्थी दिवस साजरा होणे आवश्यक आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद व प्रधानमंत्री मोदी यांच्या सहकार्यातून हा निर्णय झाला पाहिजे, अशी विनंतीही ना. आठवले यांच्याकडे केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाने छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल कमालीचे चर्चेत आहे. हे हायस्कूल पहावयास देश विदेशाच्या कानाकोप-यातून लोक येत आहेत. हा खरंतर ऐतिहासिक ठेवा असून त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून तो कोणत्याही परिस्थितीत जतन करणं आणि हे हायस्कूल आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवणं हे सरकारचे कर्तव्य आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारकडेही आग्रही धरला आहे. सद्या सातारा जिल्हा परिषदेच्या अखात्यारित हे छ. प्रतापसिहं हायस्कूल आहे, मात्र झेडपीला आजवर या हायस्कूलसाठी फार काही करता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. अलिकडेच ही शाळा चालविण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेबरोबर झेडपीने सामंज्यस करार केला आहे. यावरून हे हायस्कूल चालविण्यास वा त्याचे सवर्धन करण्यास झेडपी नाखूष आहे किंवा सक्षम नाही हेच दिसून येत आहे. रयतने कर्मवीरांच्या विचारांची कास केव्हाच सोडलेली आहे. भाऊरावांनी ज्या झाडाच्या खाली पहिली शाळा भरवली त्या पिंपळाचा अर्थात बोधीवृक्षाचा सिम्बॉल न वापरता वडाच्या झाडाचा सिम्बॉल वापरून कर्मवीरांचा बुध्दांचा विचार पूसून टाकण्याचे कौर्य केले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत रयत हे हायस्कूल कसे चालवेल ? का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या हायस्कूलला लाभलेल्या देदीप्यमान वारशाचे बाजारीकरण करेल हे सांगता येत नाही.

नवा, समृध्द, शक्तिशाली विद्यार्थी घडवायचा असेल आणि तमाम गोरगरिबबांच्या, दलित- वंचितांच्या एकूणच समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे असेल, तसेच शालेय शिक्षण चळवळीला अधिक गती द्यायची असेल तर या हायस्कूलच्या अनुषंगाने लाभलेला बाबासाहेबांचा ऊर्जादायी वारसा अत्यंत प्रेरक आहे, याचा विचार प्राधान्याने करायला हवा. तेव्हा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करावा आणि या हायस्कूलची होत असलेली परवड थांबवावी, अन्यथः महाराष्ट्रातील तमाम अनुयायांच्या वतीने राज्यभर निषेधांदोलन छेडले जाईल, असा इशाराही डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनाचे प्रवर्तक, साहित्यिक अरुण जावळे यांनी दिला आहे.