सातारा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालदिन उत्साहात

सातारा : स्वागताला कार्टूनच्या वेशातील पात्र, मनोरंजनासाठी आवडीचा चित्रपट आणि त्याबरोबर खाऊही अशा उत्साही वातावरणात सातारा इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालदिन साजरा करण्यात आला. दिवाळीच्या सुट्टीनंतर मुलांमध्ये असणारा उत्साह आणि चैतन्य स्कूलच्या व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या बालदिनामुळे व्दिगुणित झाला.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे सातारा इंग्लिश मिडियम स्कूल येथे बालदिन उत्साहात साजरा झाला. प्रारंभी मुख्याध्यापिका मिथिला गुजर आणि रोहन गुजर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर त्यांनी पंडित नेहरुंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी दुसरीतील विद्यार्थी रुद्र मोहितेने पंडित नेहरुंची वेशभूषा केली होती. मुलांना आवडणारे कार्टुनच्या वेशातील पात्र शाळेत बोलवण्यात आले होते. त्यांनी मुलांशी हस्तांदोलन करत खाऊ वाटप केले.

 

यावेळी मनोरंजनासाठी मुलांना चित्रपटही दाखवण्यात आला त्यामुळे मुलांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण होते. यावेळी सौ. जाधव यांनी बालदिन आणि गुरुनानक जयंतीची माहिती सांगितली. शाळेच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली गुजर, माध्यामिकचे मुख्याध्यापक स्वरुप सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मिथिला गुजर, तसेच व्यवस्थापक कल्पेश गुजर, को-ऑर्डीनेटर रोहन गुजर यांनी मुलांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. बालदिन यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्गाने परिश्रम घेतले. उपस्थित सर्वजणही बालदिनानिमित्त मुलांबरोबर रममाण झाले होते.