सरकारने गरीबांच्या तोंडचा घास पळवून नेला. :- सौ. चित्रा वाघ.

पाटण, दि. ६ : शिवसेनाही सत्तेत बीजेपीच्या मांडीला मांडी लावून बसली असून विकास बाजूला ठेवून शिवसेना आणि बीजेपी यांच्यात सध्या जुगलबंदी चालू आहे. आजपर्यंत सरकारने घोषणाबाजी करून जनतेला फसविले आहे. त्यामुळे चार वर्षातील सरकारने केलेल्या कामांचा जनतेने जाब विचारावा. नोटा बंदी, जीएसटी, महागाई, पेट्रोल वाढ, गॅस दरवाढ, बेरोजगारी, फसव्या घोषणा, महिला असुरक्षितता यामुळे सर्वत्र असंतोष आहे. गरीबांच्या तोंडचा घास पळवून देण्याचे महापाप सरकारने केले, असल्याची टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांनी महिला मेळाव्यात बोलताना केले.

पाटण विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या महिला आघाडीचा मेळावा श्रीराम मंदीर पाटण येथे पार पडला. याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, सौ. यशस्विनीदेवी पाटणकर, महिला जिल्हा अध्यक्षा सौ. समिंद्राताई जाधव, कार्याध्यक्षा सौ. जयश्रीताई पाटील, कामिनी जाधव, कविता म्हेत्रे, पंचायत समितीच्या सभापती सौ. उज्वला जाधव, उपसभापती राजाभाऊ शेलार, पाटणच्या नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सौ. चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, हे सरकार महागाई कमी करू शकले नाही. युवकांना रोजगार देवू शकले नाही. नोटाबंदीने जनता बेजार झाली असून त्याचा सर्वात मोठा फटका घर खर्च, संसार चालविणाऱ्या महिलांना बसला आहे. बेरोजगाराची प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काळा पैसा बाहेर काढून प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. आज खात्यावर पंधरा रुपयेही जमा झाले नाहीत. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे हाल झाले. आघाडीच्या काळात ४०० रुपयांवरील गॅस आजच्या सरकारने ८०० रुपयांवर नेला आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिलेला अश्लिलतेला सामोरे जावे लागत असून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. महिलांचे संरक्षण करणे हे सरकारचे काम असून सरकारचा नाकर्तेपणा दिसत आहे. मात्र आज कोठेही अन्याय, अत्याचार झाला तर पहिलांदा राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या महिला तेथे पोहोचतात. स्व. आर. आर. पाटील यांच्यामुळे ३३ टक्के महिला पोलीस दलात असून ती राष्ट्रवादीची देण आहे. मात्र आज महिला व मुलींच्या तील संवेदनेशीलता पोलीस दलात दिसत नाही ही दुर्दैवाची बाब आहे. हे सरकार महिलांच्या बाबतीत संवेदनशील नाही. त्यामुळेच प्रशांत परिचारक व राम कदमांसारखी बांडगुळे बोलण्याचे धाडस करतायेत. पस्तीस कायदे कागदावरच आहेत. देश महासत्तेकडे जात असताना महिलांना सॅनिटरी आणि स्वच्छतागृहांसाठी सरकारशी भांडावे लागत आहे. गाईला देव मानतो मग गाई बरोबर ताईचीही काळजी घेतली पाहिजे. अंगणवाडी सेविकांना मागण्यांसाठी आता साम, दाम, दंड भेद ही शस्त्रे घेवून उतरावे लागणार आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी राष्ट्रवादी कॉंग्रेस ठामपणे उभे आहे. आताचे सरकार खोटे बोल पण रेटून बोलत असल्यानेच ते सत्तेवर आले आहे. मात्र आम्हाला खोटे बोलता येत नाही त्यामुळे आज आम्ही विरोधात बसलो आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रची पवार साहेब यांच्या माध्यमातून पाटण येथे भव्य असे बाळासाहेब देसाई महाविद्यालय उभारले आहे. खऱ्याअर्थाने पाटण तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागातील युवतींच्या शिक्षणाची सोय झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ. स्नेहलताई जाधव यांनी प्रास्ताविक केले. सौ. शोभा कदम यांनी सुत्रसंचालन केले. रोहिणी पाटील यांनी आभार मानले. महिला मेळाव्यास सौ. रेखाताई जाधव, सौ. वंदना सावंत, सौ. संगीता पुजारी, सौ. पुजाताई कदम, सौ. मीलन सय्यद, नगरसेविका श्रीमती सरस्वती खैरमोडे, सौ. रश्मी राऊत, सौ. योगिता कुंभार, सौ. संगीता चव्हाण, सौ. अनिता देवकांत, सौ. शिलादेवी पाटणकर, अनघा थरवल, शशिकला हादवे, सौ. सुनंदा पाटील, धैर्यशील पाटणकर, दिनकरराव घाडगे, ऍड. अविनाश जानुगडे, सुभाष पवार, सत्यजित शेलार, गुरूदेव शेडगे, शंकरराव शेडगे यांच्यासह महिला कार्यकर्त्या, महिला अध्यक्षा, उपाध्यक्षा, सदस्या, सर्व सेलच्या पदाधिकारी, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्या, सर्व संस्थेच्या संचालिका, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्या, अंगणवाडी सेविका, बचतगट सदस्या मोठ्यासं”येने उपस्थित होत्या.