जनजागृती फेरीद्वारे स्वच्छतेचा नारा ; पालिकेच्या उपक्रमाला सातारकरांची साथ

सातारा : स्वच्छ शहर संकल्पनेनुसार स्वच्छतेची जनजागृती लोकांच्यात करण्यासाठी पालिकेने गांधी मैदान ते पोवईनाका अशी स्वच्छता फेरी काढली. राजमाता कल्पनाराजे भोसले , नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या हस्ते फेरीची सुरुवात करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य सभापती वसंत लेवे, स्मिता घोडके, सुहास राजेशिर्के, सविता फाळके, निशांत पाटील, श्रीकांत आंबेकर, लत्ता पवार, सुनिता पवार, सिता हादगे, भाजपचे धनंजय जांभळे आणि पदाधिकारी उपस्थित होते. पालिकेचे अधिकारी-कर्मचारी आणि शालेय मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. यावेळी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. राजवाडा, 501 पाटी आणि पोवई नाक्यावर पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पालिका हद्दीत स्वच्छ्तेबाबत जनजागृती करताना शासन निकषाप्रमाणे सातारा पालिका उपक्रम राबवत आहे. याचाच भाग म्हणून आज (मंगळवारी) शहरातून स्वच्छता फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातातील स्वच्छतेचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ओला-सुका कचरा घंटा गाडीत वेगळा टाकावा. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकू नये. यासह विविध फलक स्वच्छतेचा संदेश देत होते. फेरीची सुरुवात करताना पालिकेच्या वर्षभरातील कामाचे राजमाता कल्पनाराजे भोसले कौतुक केले. आरोग्याबाबत अण्णा लेवेनीं केलेल्या कामाचे कौतुक करताना त्यांनी घंटागाडीचा प्रश्न चांगला हाताळत शहरातील कचरा निर्मूलन मोहिमेला शुभेच्छा दिल्या. स्वच्छ भारत ऍपद्वारे दाखल होणार्‍या तक्रारींचा 24 तासात निपटारा केला जात असल्याचे नगराध्यक्षा कदम यांनी सांगताना नागरिकांनी ऍपच अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. तर आरोग्य कर्मचार्‍यांची बायोमेट्रिक हजेरी सुरू केल्यामुळे कर्मचारी पूर्णवेळ फिल्डवर असल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचे सामना करावा लागत नाही. लवकरच घनकचरा प्रोजेक्ट सुरु होणार असून शहरातून भविष्यात कचर्‍याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आरोग्य सभापती वसंत लेवे यांनी सांगितले.