राज्यातील पहिले पत्रकार कोरोना केअर सेंटर सातार्‍यात ; ऑक्सिजन मशिनसह सोयी सुविधांनी युक्त सेंटरचा निवांत येथे प्रारंभ

यवतेश्वर येथील निवांत रिसॉर्ट येथे पत्रकारांच्या कोरोना केअर सेंटरचा प्रारंभ करताना प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, युवराज पाटील, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी

सातारा :  कोरोना बाधित पत्रकारांना होम आयसोलेशनला येणार्‍या अडचणी लक्षात घेवून सातारा जिल्हा पत्रकार संघाने पुढाकार घेवून सातार्‍यातील यवतेश्वर परिसरातील हॉटेल निवांत येथे पत्रकारांसाठीचे कोरोना केअर सेंटर सुरु केले आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी पत्रकारांनीच उभे केलेले हे पहिले कोरोना केअर सेंटर (आयसोलेशन) आहे.
सातार्‍यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 31 हजाराच्या पुढे गेली आहे तर मृत्यूंची संख्या 900 च्या पुढे गेली आहे. सातार्‍यात फिल्डवर व कार्यालयात काम करणार्‍या पत्रकारांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरु आहेत. मात्र पत्रकार कोरोना बाधित झाल्यानंतर स्वतंत्र होम आयसोलेशनची सुयोग्य व्यवस्था नसल्याने सातार्‍यातील पत्रकारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. सातारा जिल्हा पत्रकार संघाने त्यावर तोडगा काढत सातार्‍यातील हॉटेल निवांत येथे 16 बेडचे दोन ऑक्सिजन मशीनयुक्त कोरोना केअर सेंटर सुरु करण्याचा संकल्प सोडला. ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब जाधव व चंद्रसेन जाधव यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातारा जिल्हा पत्रकार संघाने सोमवारी हॉटेल निवांत येथे कोरोना केअर सेंटरचा प्रारंभ केला.
यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सुजीत आंबेकर, चंद्रसेन जाधव, दीपक दीक्षित, चंद्रकांत देवरुखकर, प्रशांत जाधव, राहुल तपासे, ओंकार कदम, तुषार तपासे, तबरेज बागवान, प्रमोद इंगळे, सिद्धार्थ लाटकर, रणजित नलावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब पवार, आरोग्य कर्मचारी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
सातारा जिल्हा पत्रकार संघाने प्रशासनाच्या सूचनेनुसार याबाबतची नियमावलीही तयार केली असून त्यानुसार सातार्‍यातील ज्या पत्रकारांना घरी गृहविलगीकरणाची (होम आयसोलेशनची) सोय नाही अशाच गरजू कोरोनाबाधित पत्रकारांसाठी ही व्यवस्था आहे. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व उद्योजक सागर भोसले यांच्यामार्फत या कोरोना केअर सेंटरवर पत्रकारांसाठी दोन ऑक्सिजन मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे. तर आरोग्य विभागामार्फत 1 डॉक्टर व दोन नर्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याशिवाय आयसोलेशन सेंटरवर दोन वेळच्या जेवणाची व नाष्ट्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. होम आयसोलेशन किटही सेंटरवर ठेवण्यात आले आहे.
वृत्तपत्र अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या व्यवस्थापनांमार्फत ज्यांची पत्रकार, छायाचित्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे रिपोर्टर म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाकडे अधिकृत पत्रकार म्हणून नोंद आहे अशाच पत्रकारांना या सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ज्या बाधित पत्रकाराची ऑक्सिजन लेव्हल (डझज2) 94 पेक्षा वर आहे त्यांनाच या विलगीकरण केंद्रात प्रवेश मिळणार आहे. तेही प्रशासकीय आरोग्य यंत्रणेच्या मार्फतच तपासणी करुनच हा प्रवेश मिळेल. एकदा प्रवेश दिल्यानंतर विलगीकरण कक्षातून 10 दिवस बाहेर पडता येणार नाही. बाहेर फिरल्याचे निदर्शनास आल्यास पुन्हा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. या केंद्रावर आरोग्य यंत्रणेमार्फत डॉक्टरांसह त्यांचे सहाय्यक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आरोग्याची तक्रार असल्यास तत्काळ संबंधितांना कळवणे आवश्यक आहे. या केंद्रात येताना 10 दिवसांच्या राहण्यासाठी लागणारे कपडे, नियमित घेत असलेली औषधे व आवश्यक त्या वस्तू स्वत: आणाव्या लागतील. या केंद्रावर ध्रूमपान, मद्यपान अथवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करण्यास सक्त मनाई असेल. हे केंद्र कोरोना केअर सेंटर आहे. उपचार केंद्र नाही. त्यामुळे गृहविलगीकरणाची सोय नसलेल्या पत्रकारांसाठीच ही व्यवस्था आहे. कोरोनाबाधित झालेल्यांपैकी ज्यांना जास्त त्रास होईल त्यांनी थेट वैद्यकीय उपचार घ्यावेत. अ‍ॅडजेस्टमेंट म्हणून कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असेही जिल्हा पत्रकार संघाने जाहीर केले आहे. पत्रकारांसाठी पत्रकारांनी तयार केलेले हे पहिले कोरोना केअर सेंटर असल्याने सातारा जिल्हा पत्रकार संघाचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी कौतुक केले तर सहकार्य करणार्‍या सर्व घटकांचे सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी आभार मानले.