कोरेगाव पोलिसांच्या ताब्यातून पळालेला धनाजी चव्हाण पुन्हा जेरबंद ; कोठडीत रवानगी

कोरेगाव : पोलिसांच्या ताब्यातून सोमवारी दुपारी अलगद पसार झालेल्या धनाजी एकनाथ चव्हाण याला 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात कोरेगाव पोलिसांना यश आले आहे. पुण्याला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चव्हाण याला कुमठे फाटा परिसरात अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. 
याबाबत पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, की रुई येथील मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपी धनाजी एकनाथ चव्हाण वय 36, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव याने सोमवारी दुपारी 12.45 च्या सुमारास शांतीनगर परिसरात मोटारसायकलवरुन उडी टाकून पळ काढला होता.  चव्हाण याला न्यायालयात हजर करायचे असल्याने तत्पूर्वीच्या वैद्यकीय तपासणीसाठी मोटारसायकलवरुन नेताना त्याने हे कृत्य केले. त्याचा पाठलाग करताना पोलीस नाईक महादेव आळंदे हे जखमी झाले होते. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी तातडीने वेगवेगळी तपास पथके तयार करुन पुसेगाव, दहिवडी, सातारा, वाठार स्टेशन परिसरात पाठवली होती. दरम्यानच्या काळात मंगळवारी सकाळी एका खबर्‍याने चुडाप्पा यांना चव्हाण हा पुसेगावच्या दिशेने कोरेगावकडे येत असून, तो पुणे येथे जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे चुडाप्पा यांनी कुमठे फाटा परिसरात सापळा रचला. हवालदार प्रल्हाद पाटोळे व पोलीस नाईक सचिन साळुंखे यांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याची पोलीस बंदोबस्तात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता, न्या. एम. ए. शिलार यांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.