कोरेगावात वैद्यकीय तपासणीसाठी नेताना पोलिसाच्या ताब्यातून आरोपी पळाला ; शोध घेताना पोलीस नाईक जखमी : ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु

कोरेगाव : कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपी धनाजी एकनाथ चव्हाण वय 36, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव याने सोमवारी दुपारी 12.45 च्या सुमारास शांतीनगर परिसरात मोटारसायकलवरुन उडी टाकून पळ काढला. चव्हाण याला न्यायालयात हजर करायचे असल्याने तत्पूर्वीच्या वैद्यकीय तपासणीसाठी मोटारसायकलवरुन नेताना त्याने हे कृत्य केले. त्याचा पाठलाग करताना पोलीस नाईक महादेव आळंदे हे जखमी झाले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी, की रुई, ता. कोरेगाव येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या भांडणातून तलवार हल्ला झाला होता, या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी म्हणून धनाजी एकनाथ चव्हाण याला अटक केली होती. सोमवारी दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात त्याला हजर करायचे असल्याने वैद्यकीय तपासणी करणे नियमानुसार बंधनकारक असल्याने गार्ड ड्युटीतील पोलीस नाईक महादेव आळंदे यांना चव्हाण याची वैद्यकीय तपासणी करुन आणण्यास सांगण्यात आले.
त्यानुसार दुपारी 12.30 च्या सुमारास आळंदे यांनी चव्हाण यास ताब्यात घेतले. पोलीस ठाण्याची जीप ही अगोदरच इतर महिला आरोपी घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात गेल्याने, ती परतण्यास वेळ लागत होता. त्यामुळे आळंदे यांनी चव्हाण याला बेड्या न घालता मोटारसायकलवर पाठीमागे बसविले आणि रहिमतपूर रस्त्याने ग्रामीण रुग्णालयाकडे निघाले. शांतीनगर येथे अजिंक्यनगर कॉलनीच्या रस्त्याजवळ चव्हाण याने मोटारसायकलवर चुळबूळ सुरु केली, त्यामुळे आळंदे यांनी मोटारसायकलीचा वेग कमी केला, तेवढ्यात चव्हाण याने उडी मारली आणि पळ काढला.
आळंदे यांनी मोटारसायकल उभी करुन त्याचा पाठलाग केला, मात्र तो परिसरातील शेताकडे पळत सुटला. आळंदे हे शेतातून पळत असताना, बांधावर तोल गेल्याने ते पडले आणि जखमी झाले. अशा अवस्थेत त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन घडला प्रकार सांगितला. आळंदे यांना अचानक घाम येऊ लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
घडला प्रकार समजल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्यासह उपनिरीक्षक बळीराम सांगळे, संतोष मिसळे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी व अन्य कर्मचार्‍यांनी शोध मोहीम राबविली, मात्र चव्हाण हाती लागला नाही. अखेरीस पोलीस नाईक महादेव आळंदे यांनी ग्रामीण रुग्णालयातून फिर्याद दिली. त्याआधारे धनाजी चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संतोष मिसळे तपास करत आहेत.