प्रेमप्रकरणातून अक्षय जाधव चा खून ; पाटण जवळील येराड येथील घटना

पाटण दि. 14  ( प्रतिनिधी ) तालुक्यातील बीबी येथील अक्षय निनू जाधव वय 22 या तरुणाचा याच तालुक्यातील येराड   (खंडूचीवाडी ) येथे प्रेमप्रकरणातून खून झाल्याची घटना घडली आहे. तथापि संबधित प्रेमप्रकरणातील मुलगी व तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घ्यावे अन्यथा तोपर्यंत हा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मुलाच्या घरच्यांसह ग्रामस्थांनी घेतल्याने येथे तणाव निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बीबी येथील अक्षय जाधव हा तरूण मुबंई येथे रहात होता. त्याचे गेल्या दोन वर्षांपासून येराड  ( खंडूचीवाडी ) येथील मुलीशी प्रेमसंबंध होते. दि. 11 फेब्रुवारीला अक्षय मुबंईहून गावाकडे परत आला होता. याच काळात त्याला संबंधित मुलीचा फोनही आला होता. तर याच प्रेमप्रकरणातून अक्षयला त्या मुलीच्या कुटुंबीयांकडून सहा महिन्यांपूर्वी  मारहाण करण्यात आली होती. दरम्यान आता येराड परिसरात
अचानकपणे अक्षय चा मृतदेह सापडला यात त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी याच मुलाचे मामा कृष्णत देसाई व शिवाजी देसाई या संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर अक्षय याची मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. या खुनाची नोंद पाटण पोलीसात झाली असून तपास पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे करीत आहेत.
दरम्यान हा खून, प्रेमप्रकरणातील संबंधित मुलगी व आईने केला असल्याचा संशय अक्षय याचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी व्यक्त केला असून जोपर्यंत पोलीस संबंधित मुलगी व आईला ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत अक्षय याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा या मंडळींनी घेतला आहे. तसेच वेळप्रसंगी या मृतदेहावर संबंधित मुलीच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करू असेही   नातेवाईकांनी म्हंटले आहे .