टोळेवाडीचे माजी सरपंच नारायण डिगे यांच्यावर कोयत्याने वार, नारायण डिगे गंभीर जखमी.

पाटण, दि. – ७ : पाटण येथील लायब्ररी चौकामध्ये सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास टोळेवाडी गावचे माजी सरपंच नारायण गणपत डिगे (वय६१) यांच्यावर त्याच गावातील भिमराव सिताराम देवकांत (वय ५५) याने मद्यधूंद अवस्थेत कोयत्याने प्राणघातक हल्ला करून तीन वार केले आणि तो स्वत: पाटण पोलिसात हजर होण्यास गेला असता रस्त्त्यातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या हल्ल्यात नारायण डिगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान याची फिर्याद विशाल जगन्नाथ निकम (वय २८) रा. पिपंळोशी यांनी पाटण पोलिसात दिली असून सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी एस. आर. कचरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, टोळेवाडी गावचे माजी सरपंच नारायण गणपत डिगे (वय ६१) हे सोमवार दि. ७ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पाटण येेथील लायब्ररी चौकामध्ये ओळखीचे नंदकुमार पवार यांच्या सोबत बोलत उभे होते. यावेळी पाठीमागून आलेल्या भिमराव सीताराम देवंकांत (वय ५५) याने अचानक नारायण डिगे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये नारायण डिगे यांच्या डोक्यावर दोन, मानेवर एक आणि हातावर दोन असे पाच वार करण्यात आल्याने ते  गंभीर अवस्थेत जागीच कोसळले. यावेळी त्याठिकाणी असणाऱ्या विशाल निकम यांनी तात्काळ नारायण डिगे यांना रिक्षात घालुन पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डिगे यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबतची माहिती पाटण शहरात समजल्यानंतर डिगे यांना पाहण्यासाठी पाटण ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी जमा झाली होती.

दरम्यान, हल्ल्यानंतर संशयित आरोपी भिमराव देवकांत हा मद्यधूंद अवस्थेत स्वत:हून कोयता घेवून पाटण पोलिसात हजर होण्यास येत आसताना पोलिसांनी त्याला वाटेतच ताब्यात घेतले. याबाबतची फिर्याद विशाल जगन्नाथ निकम (रा. पिंपळोशी वय २८) यांनी पाटण पोलिसात दिली असून सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. याचा अधिक तपास पोलिस स. पो. निरीक्षक उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. आर. कचरे, के. एस. जाधव, एम. एस. मोरे हे करत आहेत.

चोकट:- पाटणच्या मुख्य लायब्ररी चौकात नारायण डिगे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या डोक्यातुन रक्ताच्या थारोळ्या उडत होत्या. यावेळी चौकात बग्यांची गर्दी झाली. मात्र प्रसंगअवदान दाखवुन तिथे हजर असलेल्या विशाल निकम या युवकाने नारायण डीगे यांना उचलुन त्यांच्या डोक्यातुन येणारे रक्त स्वत:च्या हात रुमालाने दाबुन धरले व चौकात असणाऱ्या रिक्षात घालुन त्यांना तातडीने वेळीच ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. व पोलिस स्टेशनला स्वतः फिर्याद दिली. विशाल निकम या युवकाच्या धाडशी मदत कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.