महिलेने एटीएम मधून चोरले 50 हजार रुपये ; रहिमतपूर पोलिसांनी 24 तासातच लावला छडा

 रहिमतपूर : रहिमतपूर, (ता. कोरेगांव) येथे एटीएम मधून चोरलेले 50 हजार रुपयांचा 24 तासात लावला छडा लावत रहिमतपूर पोलिसांनी महिलेस अटक केली.
याबाबत रहिमतपूर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी मंगल सुरेश चव्हाण ( वय 29) रा. ब्रम्हपुरी, ता. कोरेगाव यांनी त्यांच्या कराड अर्बन बँकेच्या एटीएम मधून 50 हजार रुपये चोरीला गेले असल्याची तक्रार दिली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदशनाखाली प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी तपास करण्याच्या सूचना दिल्या. पोलीस नाईक संतोष नाळे यांनी तक्रारदार महिला मंगल चव्हाण यांचे बँक स्टेटमेंट व एटीएम मधील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली.
दरम्यान, सदर गुन्ह्यातील आरोपी महिला चांदणी पोपट जाधव (वय 20) हिला ताब्यात घेवून तिच्याकडे तपास केला असता ती फिर्यादी महिलेच्या घराच्या शेजारी राहणारी आहे. मंगल चव्हाण यांचे एटीएम कोठे ठेवले आहे व त्याचा पिन नंबर काय आहे हे आरोपी महिला चांदणी जाधव माहीत करुन दि. 6 ऑगस्ट 2018 रोजी एटीएम मधून 10 हजार रुपये काढले. त्याच्या दुसर्‍या दिवशी 40 हजार रुपये पुन्हा काढून पुन्हा ते एटीएम फिर्यादी महिलेच्या घरी गुपचूप नेवून ठेवले या गुन्ह्याची कबुली आरोपी चांदणी जाधव हिने दिली. चोरी केलेले 50 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
या तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदशनाखाली रहिमतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, पोलीस नाईक संतोष नाळे, पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार, सचिन राठोड, महिला कॉन्स्टेबल निता घाडगे, मेघा फडतरे यांनी सहभाग घेतला.
या कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी रहिमतपूर पोलिसांचे अभिनंदन केले.