रिसवड येथे पतीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

पाटण : कोयना विभागातील रिसवड गावातील बाळू संपत रोकडे (वय 44) याचे गावातीलच एका मुलीशी असणार्‍या अनैतिक संबंधाला कंटाळून त्याची पत्नी सौ. सीता बाळू रोकडे (वय 37) हीने  बुधवारी रागाने नवर्‍याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पती बाळू रोकडे हा 84 टक्के भाजला असून त्याला तातडीने सातारा येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पाटण तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. रात्री उशिरापर्यंत या गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया कोयना पोलिसात सुरू होती.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार कोयना विभागात अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या रिसवड गावामधील बाळू संपत रोकडे (44) याचे त्याच गावातील एका मुलीशी गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याची पत्नी सौ. सीता बाळू रोकडे (वय 37) हिला होता. याच कारणावरून सदर पती-पत्नीमध्ये वांरवार भांडणे होत होती.  सदर महिलेशी असलेले अनैतिक संबंध बंद करण्यासंदर्भात पती-पत्नींमध्ये वारंवार खटके उडत होते.
याकडे पती बाळू रोकडे दुर्लक्ष करून त्या महिलेशी अधिकच संबंध ठेवत असल्याचे पत्नीच्या निदर्शनास आले. त्यामुळे बुधवार दि. 20 रोजी सकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास पती बाळू रोकडे घरातील चुलीजवळ बसला असता पती-पत्नीमध्ये वरील कारणावरून जोरदार भांडण झाले. त्यानंतर रागाच्या भरामध्ये पत्नी सौ. सीता रोकडे हिने तू त्या महिलेशी अनैतिक संबंध बंद कर असे म्हणत पतीला जाब विचारला. त्यावेळी दोघांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याने पत्नीने रागाच्या भरामध्ये पती बाळू रोकडे याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले.
यावेळी भाजलेल्या अवस्थेत बाळू रोकडे हा शेजारी असणार्‍या नातेवाईकांकडे धावत जावून पत्नीने माझ्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी बाळू रोकडे याला तातडीने हेळवाक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला सातारा येथील सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
या घटनेत पती बाळू रोकडे हा 84 टक्के भाजला असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
दरम्यान या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत कोयनानगर पोलिसात दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे यासंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही. याचा अधिक तपास पाटणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कोयनानगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे करत आहेत.