34 गुन्ह्यात सहभागी असलेला म्होरक्या फिल्मीस्टाईलने जेरबंद

सातारा : 34 गुन्ह्यात सहभागी असलेल्या म्होरक्यास व त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेने फिल्मीस्टाईलने जेरबंद केले. टोळी म्होरक्या अक्षय शेजा भोसले रा. आसगाव ता. सातारा व नाना उर्फ नाना पाटेकर उर्फ भाऊजा काळे रा. फत्त्यापूर अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. 1 सप्टेंबर 2015 रोजी म्हसवे गावच्या हद्दीत दरोडा टाकून प्रेमी युगलास लुटून त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेणार्‍या टोळीचा म्होरक्या अक्षय भोसले व साथीदार नाना काळे हे आसगाव परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यांनी त्यांच्या पथकास संबंधित ठिकाणी पहाणी करण्यात सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी गेले असता संशयीत अक्षय व नाना आढळून आले. पोलीसांची चाहूल लागल्याने अक्षय व नाना दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पथकाने दोन किलो मीटर त्यांचा पाठलाग करून त्या दोघांना एका ऊसाच्या शेतातून शोधून काढून ताब्यात घेतले. या दोघांच्या साथीदारांना अगोदरच पोलीसांनी ताब्यात घेतले होते.
आज या टोळीचे म्होरक्या सापडल्याने आणखी जिल्ह्यातील दरोड्याची गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश येईल असे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी सांगितले. सदर कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, प्रसन्न जर्‍हाड, स.फौ. सुरेंद्र पानसांडे, पो.हवा. उत्तम दबडे, मोहन घोरपडे, तानाजी माने, पो.ना. विजय कांबळे, शरद बेबले, मुबीन मुलाणी, रामा गुरव, पो.कॉ. स्वप्निल शिंदे, रूपेश कारंडे, मारूती लाटणे, म.पो.कॉ. वैशाली घाडगे, मोना निकम, चालक संजय जाधव व विजय सावंत यांनी सहभाग घेतला होता.

 

दरम्यान, पकडण्यात आलेल्या सराईत आरोपी अक्षय व नाना यांच्यावर जिल्ह्यात कोरेगाव, सातारा शहर, तालुका, भुईंज, उंब्रज, मेढा, पोलीस ठाण्यात एकुण 34 गुन्हे दाखल असून सदर आरोपी हे गुन्हा घडल्यापासून फरार होते. एलसीबीने त्यांच्या मुसक्या आवळल्याने पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पथकाचे विशेष कौतुक केले.