भर वस्तीतील सोन्याचांदीच्या दोन दुकानांवर चोरट्यांचा डल्ला

साताराः मोती चौक व शाहूपुरी चौकातील ज्वेलर्सचे दुकान फोडून दोन्ही दुकानातील सुमारे 2 लाख रूपये किंमतीच्या सोन्याचांदीच्या ऐवजावर चोरटयांनी डल्ला मारला. या घटनेची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करून श्‍वानपथक पाचारण केले असता श्‍वान घटनास्थळाजवळ घुटमळल्याने चोरटयांचा मार्ग काढण्यात पोलीसांना अडथळे येत आहेत.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, काल रात्रीच्या सुमारास मोती चौक येथील के नारकर ज्वेलर्स दुकानाचे कुलूप तोडून चोरटयांनी आत प्रवेश करून दुकानातील सोन्याचांदीचे दागिने सुमारे 97 हजार किंमतीचे चोरून नेले. तसेच शाहुपूरी चौकातील मंगलमुर्ती ज्वेल पॅलेसचे शटर उचकटून चांदीचे सुमारे 87 हजार किंमतीचे दागिने चोरून नेले. ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर शाहुपूरी पोलीसांनी दोन्ही घटनास्थळावर धाव घेतली. डीवायएसपी धरणे व पोलीस निरीक्षक पिसाळ यांनी घटनास्थळाची पाहणी करून ठसेतज्ञ व श्‍वासपथकास पाचारण केले. श्‍वान मात्र घटनास्थळावर घुटमळल्याने पोलीसांना चोरटयांचा माग काढण्यात अडथळे आले. याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात संदेश नारकर व संजय बंदरकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दोन्ही दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे ताब्यात घेतले आहेत. 
भरचौकात झालेल्या दोन चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.