औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयातील लिपिक प्रवीण मरळे लाचलुचपतच्या जाळ्यात 

सातारा : सातारा येथील औद्योगिक विकास महामंडळ व्यवस्थापक कार्यालयातील लिपिक प्रवीण कृष्णा मरळे (वय 37) गणेश चौक कोडोली मूळ रा. तुपारी जि. सांगली याला 15 हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी एमआयडीसी कार्यालयाच्या दालनात च मरळे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.
 तक्रारदार हे सातार्‍यातील असून त्यांचा सातारा औद्योगिक वसाहतीत त्यांचा प्लॉट आहे. तो प्लॉट गहाण ठेवून बँकेच्या कर्जासाठी औद्योगिक वसाहतीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळावे यासाठी तक्रारदाराने व्यवस्थापकांकडे अर्ज केला होता.
लिपिक मरळे यांनी या प्रमाणपत्रासाठी तक्रारदारांकडे 15 हजार रुपये लाच मागितली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या अर्जा नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या सूचनेनुसार पोलीस निरिक्षक बया जी कुरळे आणि त्यांच्या पथकाने मरळे याला अटक केली. त्याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.