आनेवाडी टोलनाका येथे संशयास्पदरित्या फिरताना तिघांना अटक ; तीन लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

 (छाया : प्रमोद इंगळे)
सातारा : पुणे- बेंगलोर महामार्गावर सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील पाचवड कुडाळ फाटा व आनेवाडी टोलनाका येथे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या दोन स्वतंत्र कारवाईत तिघांना अटक करण्यात आली.
पिस्टल रिकामी पुंगळी, गाडी, रोख रक्कम असा तीन लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दुर्मिळ जातीचा दुहेरी मांडूळ हस्तगत करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 1 कोटी रुपये आहे. श्रीधर ज्ञानदेव कुंभार (वय 22) धुमाळ आळी शाहूपुरी, स्वयंभू मेघराज शिंदे (वय 21, परखंदी ता वाई),  अनिकेत आनंदराव निकम (वय 23, हरळी, ता. खंडाळा)  या तिघांना अटक करण्यात आली आहे.
शशिकांत मुसळे व सागर गवसणे यां दोन अधिकार्‍यांच्या स्वतंत्र पथकांनी पाचवड कुडाळ फाटा, व आनेवाडी टोलनाक्यावर स्वतंत्रपणे कारवाया केल्या. शस्त्र तस्कर दुचाकीवरून आनेवाडी  टोलनाका परिसरातील हॉटेल महाराज येथे आले तेव्हा संशयास्पदरित्या फिरताना या दोघांना अटक केली. पिस्टल, रोख रक्कम, पुंगळी, दुचाकी असा तीन लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पाचवड-कुडाळ फाट्यावर संशयित अनिकेत निकम हातात पिशवी घेऊन जात होता तेव्हा त्याची पोलिसांनी चौकशी करून झडती घेतली तेव्हा दुर्मिळ प्रजातीचे मांडूळ दिसून आले. वन्यजीव कायद्याप्रमाणे त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि त्यांच्या सहकार्‍यांचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अभिनंदन केले आहे.