ऑनलाईन फसवणुकीमुळे हतबल दाम्पत्याला न्याय ; सातारा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाला अर्धा परतावा

सातारा : मुंबईतून घरगुती कार्यक्रमानिमित्त सातार्‍यात आलेल्या वृद्ध दांपत्याची फोनवरून ऑनलाईन साठ हजारांची फसवणूक झाल्यानंतर सातारा पोलिसांनी दाखवलेल्या समतसूचकतेमुळे सुमारे तीस हजार परतावा पिडीत दांम्पत्याला मिळाला. त्यामुळे  पोलिसांच्या सतर्कतेचे सर्व स्तरातून कौतुक होत असून  वृद्ध दाम्पत्याने ही पोलिसांचे आभार मानले.
पोलीस ठाण्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, धरावी, मुंबई येथील वृद्ध दाम्पत्य घरगुती कार्यक्रमानिमित्त सातार्‍यात आले असताना तुमचे एटीएम खराब झाले असून नवीन पाठवण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, जुन्या एटीएमचा नंबर आणि पिन सांगा, असे सुनावले. कार्ड नंबर आणि पिन सांगून ओटीपी सांगितल्यावर पिडीत वृद्धाच्या खात्यावरून साठ हजार कमी झाले. आपल्या खात्यावरून रक्कम कशी कमी झाले हे विचारण्यापूर्वीच फोन कट झाला होता. मग वेळ न दवडता हे वृद्ध दाम्पत्य पोलीस ठाण्यात पोहचले आणि हा कट त्यांनी पोलिसांना सांगितला. यावेळी शहर पोलीस ठाण्यातील संतोष महामुनी आणि शिवाजी भिसे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हा सारा प्रकार सायबर क्राईमच्या एपीआय गजानन कदम, विकी फडतरे, अमित झेंडे, निखील जाधव यांच्या निदर्शनास आणून दिला आणि सूत्रे हलवण्यात आली. ज्याने वृद्धांची फसवणूक करून ऑनलाईन खरेदी केली होती, त्याचा हा प्रताप कंपन्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ कंपन्यांच्या प्रतिनिधींनी दिलेली ऑर्डर रद्द करून ती रक्कम मूळ खात्यात वर्ग केली. मात्र, ऑनलाईन फंड्यात काही रक्कम त्या भामट्याने युपी आणि बिहार येथील बोगस खात्यांवर वळवून लाभ घेतल्याने त्या भामट्याला पकडणे मुश्किल असल्याचे एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या विनंतीवर सांगितले. मात्र, पिडीत दांपत्याने वर्दीतल्या माणुसकीचे आभार मानले असून अशा ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू नका. कोणालाही आपल्या खाते, एटीएम नंबर-पिन आणि अन्य गोपनीय क्रमांकाची माहिती देऊ नका, असे कळकळीचे आव्हान केले असून पोलिसांचे आभार मानले.