शहरात स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी पाच मटका अड्ड्यांवर छापे

सातारा : शहरात स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी पाच मटका अड्ड्यांवर छापा टाकला. यात दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख ८२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जुगार साहित्य जप्त केले आहे.
याबाबत माहिती अशी की, पर्यवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोडे, पर्यवेक्षाधीन उपअधीक्षक नंदा पाराजे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सातारा शहरातील विविध ठिकाणच्या ५ जुगार व मटका अड्ड्यांवर छापा टाकला.
यामध्ये काळूबाई मंदिर, प्रतापसिंहनगर येथे छापा टाकून समीर सलीम कच्छी (वय ३६ रा. जगदिश्वर कॉलनी, मोळाचा ओढा, सातारा) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख १० हजार ७०५ रुपये रोख व जुगार साहित्य जप्त केले. सातारा-कोरेगाव रस्त्यावर कॅनॉलजवळील दूध डेअरीच्या आडोशाला छाटा टाकून मकरंद शांताराम शिंदे (२९, गुरुवार पेठ, सातारा) ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३७ हजार ९०२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वाढेफाटा येथे भंगार दुकानातून बाळकृष्ण दिनकर कणसे (५०, कोडोली) व समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा) यांना ताब्यात घेऊन १५ हजार ३२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रविवार पेठ मनाली हॉटेल शेजारी झाकीर हुसेन शेख (४६, कोरेगाव), अझरुद्दीन शबीर मणेर (वय ३२, शनिवार पेठ), सचिन सुपेकर यांना ताब्यात घेऊन २ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लक्ष्मी टेकडी पाण्याची टाकी परिसरातून शंकर भीमराव छोत्रे (वय ३४, रा. शेंद्रे) सागर अशोक शिंदे (वय ३०, लक्ष्मी टेकडी), अरुण माने (रा. पाटखळमाथा, ता. सातारा) यांना ताब्यात घेऊन १६ हजार १२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.