घरफोडीप्रकरणी एका महिलेसह सराफाला अटक

सातारा : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 3 सप्टेबर रोजी बुधवार पेठ येथून तक्रारदार शकील बन्ने यांचे बंद घरफोडून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 62 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरुन नेला होता. शाहूपुरी पोलिस याप्रकरणाचा तपास करत असताना अल्पवयीन दोन शाळकरी मुलांनी सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असता त्यांच्या दप्तरामध्येच चोरीचे थोडे दागिने मिळाली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर चोरीची कबुली देवून उर्वरीत दागिने सुरेखा सुभाष पवार (रा.आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) हिच्याकडे असल्याचे सांगितले.
शाहूपुरी पोलिसांनी महिलेला ताब्यात घेवून चौकशी केली असता तिनेही चोरीची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही मुले व महिलेकडून दागिने जप्त केल्यानंतर त्यामध्ये आणखी दागिने कमी असल्याचे समोर आले. त्याबाबत माहिती विचारल्यानंतर गुलाबजी हिंदुजी ज्वेलर्स दुकानाचे मालक मोतीलाल जेठमल जैन (रा.शनिवार पेठ, सातारा) याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार ज्वेलर्स दुकानदार मोतीलाल जैन याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने महिलेकडून दागिने घेतल्याची कबुली. त्यानुसार पोलिसांनी ज्वेलर्स दुकानदाराला अटक केली. संशयित महिला व ज्वेलर्स दुकानदाराला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. 9 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. अशाप्रकारे एलसीबी व शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दरम्यान, घरफोडीप्रकरणी संशयित महिलेस सोने खरेदी करणारा सराफ असोसिएशनचा अध्यक्ष मोतीलाल जैन याला अटक करण्यात आली दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.