खासगी सावकारी विरोघात तिघांना अटक; चौघांवर गुन्हा

सातारा : खाजगी सावकारकी प्रकरणी तीन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. पल्लवी संजय शिंदे वय 45, रा. मुक्ता चेंबर्स भवानी पेठ सातारा, असीफ मुबारक शेख, वय 35 रा. मंगळवार पेठ सातारा. अभिजीत अशोक होनराव वय 33 रा. केसरकर पेठ सातारा अशी अटक केलेल्या खाजगी सावकारांची नावे, तसेच यात चौथ्या आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून सोमनाथ उर्फ गोट्या शेडगे वय 25 रा. गडकर आळी सातारा असे आरोपीचे नाव आहे.

 

मंगळवार पेठेतील सौ मनिषा अजित खरे वय 31 यांनी बचत गटाचे व्याजाने काढलेले पैसे भरण्याकरिता पैसे कमी पडत असल्याने वरील संशयीतातील एकाकडून व्याजाने 50 हजार घेतले. त्यावेळी पैसे परत देताना 20 टक्के व्याजाने तुम्हाला पैसे द्यावे लागतील असे सांगून त्यांच्याकडून 20 टक्के व्याजाने पैसे घेतले. व्याजाचे पैसे देणेकरीता कमी पडत असलेने सौ खरे यांनी दुसर्‍या सावकाराकडून 20 टक्के व्याजाने 80 हजार रूपये घेतले. या दोन्ही व्यक्तींनी व्याजाच्या पैशाचा तडाखा लावल्याने सौ खरे यांनी तिसर्‍या माणसाकडून वेळोवेळी तीन लाख रूपये घेतले. या तीन लाखाचे 20 टक्के व्याजाने 2 लाख 40 हजार रू देऊनही आणखी 1 लाख रूपये व्याजाचे शिल्लक असल्याचे सांगून सौ खरे यांना दमदाटी करण्यास सुरूवात केली. या तिघांचे व्याजाचे पैसे देण्याकरिता सौ खरे यांनी पल्लवी संजय शिंदे यांच्याकडून 6 लाख 62 हजार रूपये घेतले. त्यांना व्याजापोटी सौ खरे यांनी 2 लाख 57 हजार रू देऊनही शिंदे यांनी 5 लाख रूपये देणे बाकी असल्याचे सांगून दमदाटी व मारहाण करण्याची धमकी दिली. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने वरील तीन संशयीत आरोपींना अटक करून शाहुपूरी पोलीस ठाण्यात सावकारकी अधिनियमनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चौथा आरोपी सोमनाथ शेडगे याचा शोध सुरू आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. पद्माकर घनवट, पो. उप.नि. रमेश गर्जे, प्रसन्न जराड, गजानन मोरे, सागर गवसणे. स. पो.फौ. पृथ्वीराज घोरपडे, पो.हवा. विजय शिर्के, पो.ना. विजय कांबळे, शरद बेबले, म. पो.हवा राजश्री भोसले, म. पो. ना. वैशाली घाडगे, नुतन बोडके, पो. कॉ. नवनाथ कदम व चालक पो. कॉ. संजय जाधव यांनी सहभाग घेतला होता.  या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांचे विशेष अभिनंदन केले.