दहिवड (पुनर्वसित) गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध: आ.जयकुमार गोरे

सातारा : दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे दान केलेल्या दहिवड (पुनर्वसित) गावाच्या विकासासाठी भविष्यात सदैव कटिबद्ध राहीन अशी ग्वाही माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.
दहिवड (पून.) गावच्या जोतिर्लिंग मंदीरात मूर्तीस्थापणा आणि कलशारोहन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प.पू. समर्थ सदगुरु बालयोगी सिद्धेश्वर सिंग महाराज, सरपंच अरुण देवरे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष अनिल तरडे, संतोष देवरे, विठ्ठल देवरे, मानसिंग देवरे, कृष्णा देवरे आदी उपस्थित होते.
यावेळी जयकुमार गोरे म्हणाले, दहिवड गावाने आपल्या मूळ गावातील जमीन-जुमला सोडून दुष्काळी माण-खटावला पाणी मिळावे यासाठी आपल्या सर्वस्वाची होळी केली आहे. त्यांनी दिलेले हे बलिदान निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या हा बलिदानाची जाणीव आमदार म्हणून आम्हाला निश्चितच आहे. त्यांचे हे बलिदान कदापि वाया जावू देणार नाही. भविष्यात दहिवडच्या विकासासाठी लागेल ती मदत करणार आहे. गावच्या दैवतासाठी एकजुटीने उभारलेले मंदिर आणि त्यातून दिसणारी गावाची एकी निश्चितच अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. तसेच गुरसाळे फाटा ते दहिवड गाव आणि अंतर्गत रस्ता त्वरित डांबरीकरण पूर्ण करू, नागरी सुविधा पूर्ण करू अशी ग्वाही दिली.
यावेळी जीर्णोद्धारासह मूर्तीस्थापना, कलशारोहन समारंभ अलोट उत्साहात व भक्तीभावात पार पडले. यावेळी मुंबई मंडळ, ग्रामस्थ, महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.