रस्ता अडवणूक प्रकरणी पाच गावांचा तहसिलदारांसमोर टाहो

वडूज: खटाव तालुक्यातील वडूज-डाळमोडी रस्त्याच्या कामास वडूज हद्दीतील निसळबेंद वस्तीवरील एका कुटुंबाने अडवणूक केल्यामुळे पाच गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. महसूल प्रशासनाने या विषयावर तातडीने तोडगा काढावा याकरीता संबंधित गावातील विद्यार्थी व प्रमुख कार्यकत्यांनी तहसिलदार जयश्री आव्हाड यांच्या दालनात टाहो फोडला.
याबाबतची अधिक माहिती अशी, वडूज-डाळमोडी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरु आहे. या कामात निसळबेंद येथील एका कुटुंबियाने आडकाठी आणली आहे. त्यामुळे सदर मार्गावरील सर्व एस.टी.बस फेर्‍या बंद झाल्या आहेत. त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना बसत आहे. सदरच्या कुटुंबास अधिकारी व प्रमुख कार्यकत्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित कुटुंब कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे प्रमुख कार्यकत्यांसह रस्त्यावर काम करणारे मजूर, बांधकाम विभागाचे अधिकारी यांची वादावादी होत आहे. महसूल प्रशासनाने वेळेवर बंदोबस्त केला नाही तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. असा इशाराही यावेळी कार्यकत्यांनी बोलताना दिला.
यावेळी झालेल्या चर्चेत संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, युवा नेते राजेश निकम, डांभेवाडीचे सरपंच यमुना देशमुख, प्राचार्य आनंदराव घोरपडे, विष्णूपंत निकम, कु. श्रध्दा निंबाळकर आदिंनी सहभाग घेतला. यावेळी अमृतराव निंबाळकर, अमोल पाटील, सुनिल पाटील, भूषण घाडगे, राजेंद्र निंबाळकर, रामकृष्ण निंबाळकर, सुरेश घाडगे, मुकुंद घाडगे, दिपक निकम, प्रभाकर नांगरे, गजानन निकम, दिलीप चौधरी, रुपेश माने, बाळासाहेब भुजबळ आदिंसह शेकडो ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.