सज्जन गडावर रंगली संतुर आणि तबल्याची जुगलबंदी ; गुुरुवारी सौ.मंजुषा पाटील यांचे गायन व अमर ओक यांचे बासरी वादन

सातारा ःश्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगड येथे आयोजित दासनवमी संगीत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी सुप्रसिध्द संतुर वादक पदमश्री पं.सतीश व्यास यांनी संतुर वादन,पदमश्री पं. विजय घाटे यांनी तबला वादन व सौ.शिल्पा पुणतांबेकर यांनी शास्त्रीय गायन व अभंगवाणी समर्थ चरणी अर्पण करुन या महोत्सवात रंगत वाढवली.
 पूर्वार्धात सुप्रसिध्द गायिका शैला दातार यांच्या कन्या व शिष्या सौ.शिल्पा पुणतांबेकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात रागश्री रागातील मध्यलयीतील  त्रितातालातील..माई चलो रामसिया दर्शंन को.. या बंदिशीने करत त्यानंतर अभंगवाणीला सुरुवात केली. यामध्ये ..रामछबी अतिसुंदर.. अमृताहूनी गोडनाम तुझे देवा..विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी.. बोलू ऐसे बोले जेणे विठ्ठल डोेले..सादर करुन प्रभू श्रीरामचंद्राचे..वर्णन असलेले ..कौसल्येचा राम माझा.. हे पद सादर करुन आपल्या अभंगवाणीची सांगता समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या.. ताने स्वर रंगवावा.. या आरती अंकलीकर यांनी गाउन अजरामर केलेल्या अभंगाने केली.
 त्यानंतर पदमश्री पं.सतीश व्यास यांनी आपल्या संतुर वादनाची सुरुवात रागेश्री रागातील मध्य लयीतील वादनाने केली. त्यात त्रिताल, विलंबीत व द्रूत लयी सादर करुन दाखवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पदमश्री पं.विजय घाटे यांनी आपल्या तबल्यावर काढलेल्या टप्पे, झालाची पेशकश अतिशय सुरेख होती. यातच द्रुत लयीत संतुर व तबल्याची जुगलबंदी होत असताना वेगवेगळ्या खंडजाती व मिश्र जातीच्या लयकारींचे दर्शन घडवत वादनातील सवाल जबाब ही सादर झाले.
पं.सतीश व्यास यांना संतुर वादनात तबल्यावर साथ करणारे पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य पदमश्री पं.विजय घाटे  हे असे कलाकार आहेत की ज्यांनी आजवर संपुर्ण भारतातील सर्व महनीय व्यक्ती असणार्‍या गायक,वादकांना आपली तबल्याची साथ केली व जे स्वत: तालचक्र संगीत अकादमी पुणे चे संस्थापक आहेत यांनी केली. सलग 2005 पासून पं. विजय घाटे हे सज्जनगडावर समर्थं सेवेसाठी  येत आहेत.
पूर्वार्धातील सौ.शिल्पा यांचे  गायनाचे वेळी संवादिनी साथ पं.प्रमोद मराठे व आप्पा जळगावकर , रमाकांत परांजपे यांची शिष्या असणार्‍या सौ.दिप्ती कुलकर्णी यांनी केली तर तबल्यावर साथ पं.जी.एल.सामंत व सुरेश सामंत यांचे शिष्य समीर पुणतांबेकर यांनी केली. ज्येष्ठ वादक माउली टाकळकरांच्या टाळांची साथ ही अभंगवाणीचा गोडवा अधिक वाढवणारीच होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समर्थ भक्त अजेयबुवा देशपांडे रामदासी व रमेशबुवा शेंबेकर यांनी केले.यानंतर समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सर्व कलाकारांचा तसेच मर्चंट नेव्हीतील चीफ इंजिनिअर कौस्तुभ दांडेकर यांचा सत्कार समर्थ सेवा मंडळाचे वतीने रमेशबुवा शेंबेकर  व  सौ.रसिकाताई ताम्हणकर यांनी रामनामी,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन केले.यावेळी समर्थं भक्त अरविंदबुवा रामदासी,योगेश बुवा रामदासी,मकरंदबुवा रामदासी,गोविंदराव बेडेेकर,डॉ.समीर सोहोनी,मीनाताई देशपांडे,श्री.शर्मा यांचेसह संपुर्णं महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश परदेशातुन आलेले शेकडो समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 उद्या दि.8 फेब्रुवारी रोजी  या गायन महोत्सवाची सांगता अमर ओक यांचे बासरी वादन व  सौ.मंजुषा पाटील  यांचे गायनाने  होणार असुन त्यांना तबला साथ प्रशांत पांडव पखवाज साथ प्रसाद जोशी  व संवादिनी साथ रोहित मराठे हे करणार आहेत.
(छायाः अतुल देशपांडे)